कृष्णावर सहकारची हॅट्ट्रिक; विकासाला सभासदांची पुन्हा पसंती दणदणीत विजयाने विरोधकांचा धुव्वा, कार्यक्षेत्रात गुलाल-फटाक्यांचा जल्लोष



कराड : विद्या मोरे

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत कारखान्यावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. सभासदांनी पुन्हा एकदा विकास, स्थैर्य आणि विश्वासाच्या बाजूने कौल देत सहकार पॅनेलला भरघोस पाठिंबा दिला. मतमोजणीच्या सुरुवाती पासूनच स्पष्ट झालेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिल्याने कराडसह संपूर्ण कार्यक्षेत्रात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
पहिल्याच फेरीत विजयाची दिशा स्पष्ट

वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या फेरी पासूनच सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी संस्थापक पॅनेलवर मोठी आघाडी घेतली. पहिल्याच फेरीत सरासरी साडेसात हजार मतांची आघाडी मिळाल्याने निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. त्यानंतर प्रत्येक फेरीत सहकार पॅनेलची आघाडी कायम राहिल्याने समर्थकांचा उत्साह वाढत गेला. दुपारपर्यंत विजयाची चर्चा संपूर्ण कार्यक्षेत्रात रंगू लागली होती.

मतमोजणी केंद्रासह रेठरे बुद्रुक मध्ये ही जल्लोष
निकालांचा कल सहकार पॅनेलकडे झुकत असल्याचे स्पष्ट होताच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दुमदुमून गेला. अनेक कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठ्या मारत आनंद व्यक्त केला, तर काहींनी नृत्य करून विजयाचा उत्सव साजरा केला.
कारखान्याचे मुख्यालय असलेल्या रेठरे बुद्रुक गावातही विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील प्रमुख चौक, कारखाना परिसर आणि विविध भागांत सभासद व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गुलालाने लाल झालेला परिसर, आकाशात झेपावणारे फटाके आणि विजयाच्या घोषणा यामुळे संपूर्ण गाव जल्लोषात न्हाऊन निघाले. अनेक ठिकाणी पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत रेठरे बुद्रुकसह संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण कायम होते.
सर्वच गटांमध्ये सहकारचे निर्विवाद वर्चस्व

अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, महिला राखीव गट आणि सर्वसाधारण गट अशा सर्वच स्तरांवरील मतमोजणीत सहकार पॅनेलने सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली. प्रत्येक गटातील उमेदवारांना मिळालेला भरघोस प्रतिसाद हा कारखान्याच्या विकासकामांवर सभासदांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक मानला जात आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल एकतर्फी होत असल्याचे चित्र मतमोजणीदरम्यानच स्पष्ट झाले होते.

सभासदांच्या विश्वासाचा विजय : डॉ. सुरेश भोसले

विजयानंतर प्रतिक्रिया देताना कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी हा विजय सभासदांच्या विश्वासाचा आणि कारखान्याने केलेल्या विकासकामांचा गौरव असल्याचे सांगितले. कृष्णा कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि मोठा सहकारी साखर कारखाना असून सुमारे ४५ ते ५० हजार सभासद त्याच्याशी जोडलेले आहेत. गत अकरा वर्षांत सभासदांना उच्चांकी ऊसदर, घरपोच साखर तसेच विविध शेतकरीहिताच्या योजना देण्यात आल्या. या कामांचीच पावती सभासदांनी पुन्हा एकदा दिली असून तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी मिळाल्याने आगामी काळ अधिक जबाबदारीचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करत कृष्णा कारखान्याला महाराष्ट्रातील अग्रेसर कारखाना म्हणून अधिक उंचीवर नेणे हेच आमचे ध्येय राहणार आहे.”
विकासाच्या राजकारणाला सभासदांची साथ : डॉ. अतुलबाबा भोसले

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनीही सभासदांचे आभार मानत हा विजय अपेक्षेपेक्षा अधिक मोठा असल्याचे सांगितले. मागील निवडणुकीत मिळालेल्या आघाडीपेक्षा अधिक मोठे यश मिळविण्याचे आव्हान यावेळी होते आणि सभासदांनी ते यशस्वीपणे पूर्ण करून दाखविले, असे त्यांनी नमूद केले.

“चार तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या आणि ५० हजारांहून अधिक सभासद असलेल्या या विशाल कार्यक्षेत्रात सभासदांनी दाखविलेला विश्वास ही आमच्या कामाची पावती आहे. सहकारात राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व देणाऱ्या सर्व नेत्यांचे आणि सभासदांचे आम्ही ऋणी आहोत,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे कारखान्याच्या विकासाला गती मिळाली असून, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील नवे संचालक मंडळ भविष्यात कारखान्याचा आणि सभासद शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विकासाला मिळालेली सभासदांची पावती

सलग तिसऱ्यांदा मिळालेला हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून कृष्णा कारखान्याने गेल्या दशकभरात राबविलेल्या विकासकामांवरील सभासदांचा विश्वास असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होती. एकतर्फी निकाल, सर्व गटांतील वर्चस्व आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कृष्णा कारखान्याच्या राजकारणात सहकार पॅनेलचे वर्चस्व आणखी भक्कम झाल्याचे या निकालातून अधोरेखित झाले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार