कृष्णा विश्व विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत सोहळा सोमवारी ९७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ प्रमुख पाहुणे
कराड : विद्या मोरे
कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत सोहळा सोमवार, २९ जून रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील ९७२ विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात येणार असून, २६ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे.
डॉ. अभिजात शेठ प्रमुख पाहुणे
या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले असतील.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सहा अधिविभागांतील विद्यार्थ्यांना पदवी
यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात मेडिसिन (३८५), नर्सिंग (१५८), दंतविज्ञान (९७), फिजिओथेरपी (१२६), सायन्स अँड टेक्नॉलॉजी (७२) आणि फार्मसी (१३४) अशा सहा अधिविभागांतील विद्यार्थ्यांना एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बी.एस्सी. नर्सिंग, एम.एस्सी. नर्सिंग, एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बी. फार्मसी आदी अभ्यासक्रमांच्या पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान
शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या २६ विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असून, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव दीक्षांत सोहळ्यात केला जाणार आहे.
ग्रामीण आरोग्यसेवेपासून जागतिक नावलौकिकापर्यंतचा प्रवास
ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९८२ मध्ये कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर १९८४ मध्ये कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना झाली आणि २००५ मध्ये संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला असून, 'नॅक'कडून 'ए प्लस' श्रेणीचे मानांकन प्राप्त केले आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
Comments
Post a Comment