बापूसाहेब लांडगे यांचा इशारा : हजारमाचीतील पाणीपुरवठा व बंदिस्त गटरसाठी १३ जुलैपासून आमरण उपोषण ; जनहिताय फाऊंडेशनचे प्रशासनाला निवेदन; दहा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन
कराड, दि. ३० : विद्या मोरे
ग्रामपंचायत हजारमाची-सदाशिवगड हद्दीतील सदाशिव कॉलनी मळा, वॉर्ड क्रमांक १ व २ मधील नागरिकांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तातडीने सुरू करावा तसेच गणपती मंदिर ते एम.एस.ई.बी. रोडदरम्यान बंदिस्त गटरची उभारणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी जनहिताय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब (बापू शंकर) लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कराड व ग्रामपंचायत हजारमाची-सदाशिवगड प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मागण्या दहा दिवसांत पूर्ण न झाल्यास दि. १३ जुलै २०२६ पासून प्रशासकीय इमारत, कराड येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
● पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर
सदाशिव कॉलनी मळा परिसरातील नागरिकांनी नळजोडणी व पाणीमीटरचे शुल्क भरूनही अद्याप नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झालेला नाही. मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली असली तरी घरगुती नळांना पाणी सोडण्यात आले नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
● बंदिस्त गटरची तातडीची गरज
गणपती मंदिर ते एम.एस.ई.बी. रोडदरम्यान सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पावसाळ्यात दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचा धोका वाढला आहे. या कामासाठी निधी उपलब्ध असूनही बंदिस्त गटरचे काम रखडल्याचा आरोप करत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
● आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने दहा दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास १३ जुलैपासून प्रशासकीय इमारत, कराड येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत हजारमाची-सदाशिवगड, पंचायत समिती कराड, सार्वजनिक बांधकाम विभाग (कराड उत्तर) आणि जिल्हा परिषद सातारा प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन जनहिताय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब (बापू शंकर) लांडगे, संस्थापक उपाध्यक्ष मारुती बोभाटे, सदस्य राजेंद्र ताटे, विशाल लांडगे, निवास माने, अशोक दिनकर पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव डुबल तसेच माजी नगरसेवक शांताराम थोरखेड यांच्या उपस्थितीत देण्यात आले
Comments
Post a Comment