कराडच्या नागरी सुविधांमध्ये ऐतिहासिक भर ; राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपरिषदेला सुमारे २ कोटींची अत्याधुनिक वाहने
कराड, दि. ३० : विद्या मोरे ; कराड शहराच्या स्वच्छता, सुरक्षितता आणि आपत्कालीन सेवांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय प्रत्यक्षात आला असून, कराड नगरपरिषदेला सुमारे २ कोटी रुपयांची अत्याधुनिक स्वच्छता व अग्निशमन वाहने प्राप्त झाली आहेत. मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्यामुळे तसेच राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली ही वाहने उपलब्ध झाली आहेत. या माध्यमातून शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक गतिमान होण्याबरोबरच अग्निशमन विभागाची कार्यक्षमता आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
● विकासाभिमुख नेतृत्वाची आणखी एक यशस्वी नोंद
कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणारे मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी शहरासाठी विविध विकासकामे, निधी आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे आणि प्रशासनाशी केलेल्या समन्वयातून कराड नगरपरिषदेला वेळोवेळी विविध विकासकामांसाठी निधी मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता आणि अग्निशमन विभागासाठी आधुनिक वाहने उपलब्ध झाल्याने नागरिकांना अधिक जलद, दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देणे शक्य होणार आहे.
● स्वच्छ भारत अभियानातून मिळाली अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीन
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कराड नगरपरिषदेला अंदाजे १ कोटी रुपये किंमतीची अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीन प्राप्त झाली आहे. या वाहनाची एकूण क्षमता ८ हजार लिटर असून त्यामध्ये ४ हजार लिटर सक्शन आणि ४ हजार लिटर जेटिंग क्षमता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही मशीन शहरातील गटारे, भूमिगत सांडपाणी वाहिन्या, सीवर लाईन, मॅनहोल तसेच ड्रेनेज व्यवस्थेतील गाळ, कचरा आणि अडथळे यांत्रिक पद्धतीने प्रभावीपणे दूर करण्यास सक्षम आहे.
या मशीनमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना धोकादायक परिस्थितीत प्रत्यक्ष गटारात उतरून काम करण्याची गरज कमी होणार असून, स्वच्छता व्यवस्था अधिक सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने राबविता येणार आहे. विशेषतः पावसाळ्यात गटारे तुंबणे, पाणी साचणे आणि दुर्गंधी निर्माण होण्याच्या समस्या कमी करण्यासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
● अग्निशमन विभागाला मिळाले आधुनिक मिनी फायर टेंडर
महाराष्ट्र शासनाच्या नगर प्रशासन संचालनालय (DMA) मार्फत कराड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला अंदाजे ९८ लाख रुपये किंमतीचे Force Gurkha 4×4 Mini Fire Tender उपलब्ध झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे वाहन शहरातील अरुंद रस्ते, दाट लोकवस्ती, ग्रामीण भाग तसेच औद्योगिक परिसरात तातडीने पोहोचून अग्निशमन व बचाव कार्य करण्यास सक्षम आहे.
या वाहनामध्ये ३०० लिटर पाणी साठवण क्षमता, ३० लिटर फोम क्षमता, अत्याधुनिक रेस्क्यू टूल्स, फर्स्ट एड बॉक्स आणि इतर आवश्यक आपत्कालीन साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे आग विझविण्याबरोबरच अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्कालीन प्रसंगी बचाव कार्य अधिक जलद, प्रभावी आणि सुरक्षित पद्धतीने करता येणार आहे. यामुळे कराड शहराच्या आपत्कालीन व्यवस्थापन क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
● नागरिकांना दर्जेदार नागरी सेवा देण्याचा संकल्प
स्वच्छ, सुरक्षित, आधुनिक आणि विकसित कराड घडविण्याच्या उद्देशाने कराड नगरपरिषद सातत्याने विविध विकासकामे राबवत आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक वाहनांमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून, अग्निशमन विभागाची कार्यक्षमता अधिक सक्षम होणार आहे. नागरिकांना जलद, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून, भविष्यातही शासनाच्या सहकार्याने अशाच विकासाभिमुख योजना शहरात राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या दोन्ही अत्याधुनिक वाहनांच्या समावेशामुळे कराड शहराच्या नागरी व्यवस्थापनात नवे पर्व सुरू झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे शहराच्या विकासाला आणखी गती मिळणार असून, कराड अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक शहर म्हणून पुढे जाण्यास निश्चितच मदत होणार आहे.
Comments
Post a Comment