एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी; कराड पंचायत समिती कटिबद्ध
● एकल महिलांच्या उन्नतीसाठी पंचायत समितीचा निर्धार
तालुक्यातील एकल महिलांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी कराड पंचायत समिती कटिबद्ध असून, त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, बचत गटांशी जोडणे तसेच त्यांच्या समस्यांचे सर्वेक्षण करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या उपसभापती अनिताताई वेताळ यांनी केले.
● एकल महिला दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम
कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह (बचत भवन) येथे कराड पंचायत समिती व एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकल महिला दिन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या विजयाताई थोरात, विद्याताई वेताळ, सुनंदाताई पाटील, पंचायत समिती सदस्य संग्रामबाबा पवार, सिद्धार्थ चव्हाण, रविंद्र बडेकर, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. मैथिली मिरजे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.● ज्ञानदीप संस्थेच्या कार्याचे कौतुक
अनिताताई वेताळ म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कराड तालुक्यात ज्ञानदीप सामाजिक संस्थेने एकल महिलांचे संघटन उभे करून त्यांना सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास दिला आहे. मधुराणी थोरात यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला अधिक बळ मिळणार आहे.
● 'एकल महिला' ही सन्मानाची ओळख
ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने 'विधवा'ऐवजी 'एकल महिला' हा सन्मानजनक शब्द स्वीकारून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. हा केवळ शब्दबदल नसून समाजाची मानसिकता बदलणारे पाऊल आहे. प्रत्येक एकल महिलेला सन्मानाने वागणूक मिळावी आणि प्रत्येक शुभकार्यामध्ये त्यांचा सन्मानपूर्वक सहभाग असावा, असे त्यांनी सांगितले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त महिलांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावाही त्यांनी घेतला.
● योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
विद्याताई वेताळ, विजयाताई थोरात आणि संग्रामबाबा पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार असून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
● संघर्षातून यशाकडे वाटचाल
वैशाली पाटील आणि शितल कुंभार यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाची यशोगाथा सांगितली. ज्ञानदीप संस्थेच्या मार्गदर्शनामुळे संकटांवर मात करत स्वबळावर उभे राहून आज समाजात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचा अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
● विविध शासकीय योजनांवर मार्गदर्शन
कार्यक्रमात निवेदिता कांबळे यांनी बालसंगोपन योजना, सविता कुडतरकर यांनी संजय गांधी निराधार योजना, पल्लवी पाटील यांनी घरकुल योजना, विद्या चव्हाण यांनी शिधापत्रिका, काजल कुंभार यांनी अनाथ प्रमाणपत्र, आशादेवी चव्हाण यांनी महिला विषयक कायदे, डॉ. मैथिली मिरजे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन, तर वैष्णवी यादव यांनी महिला समुपदेशन केंद्राच्या कार्याची माहिती दिली.● स्वागत व आभार
कार्यक्रमाचे स्वागत गणेश विभुते यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रतिभा लोंढे यांनी मानले.
Comments
Post a Comment