महिला कराओके मंचच्या ५१ विक्रमवीर महिलांचा नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते सत्कार
कराड : विद्या मोरे
महिला कराओके मंच, कराडच्या वतीने सलग १५ तास लावणी गायनाचा आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ५१ विक्रमवीर महिलांचा गौरव सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते सर्व सहभागी महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
महिला कराओके मंचने १ मार्च रोजी आयोजित केलेल्या या विशेष उपक्रमात ५१ महिलांनी सलग १५ तास लावणी गायन सादर करून एक आगळावेगळा विक्रम नोंदविला होता. या उल्लेखनीय कामगिरीची दखल ग्लोबल जीनियस बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि वुमन्स बुक ऑफ रेकॉर्ड या आंतरराष्ट्रीय विक्रम संस्थांनी घेतली असून, कराडच्या महिला शक्तीने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.
या गौरव सोहळ्यास डॉ. सुधाकर बेंद्रे, संदीप मुंढेकर आणि दत्तात्रय तारळेकर, इनर व्हील संगम कराड पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या जिद्द, आत्मविश्वास आणि कलाप्रेमाचे कौतुक करत हा विक्रम कराडसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
महिला कराओके मंचच्या सौ. जयश्री भागवत आणि सौ. धनश्री रोकडे यांच्या नेतृत्वाखाली हा विक्रमी उपक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धती, मेहनत आणि सर्व सहभागी महिलांच्या सहकार्यामुळे या विक्रमाची तीन आंतरराष्ट्रीय विक्रम पुस्तकांत नोंद होऊ शकली. या यशामुळे कराडच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे.
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी महिलांच्या या यशाचे अभिनंदन करत लावणीसारख्या समृद्ध लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महिलांना आपल्या कला-सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य महिला कराओके मंच करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व सहभागी महिला, आयोजक सौ. जयश्री भागवत, सौ. धनश्री रोकडे तसेच सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. उत्साह, आनंद आणि अभिमानाने भरलेल्या या सोहळ्यात उपस्थितांनी विक्रमवीर महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment