दुर्लक्ष केले असते तर आयुष्यभर स्वतःलाच माफ करू शकलो नसतो"; शरद जगन्नाथ गाडे यांच्या संवेदन शीलतेतून बेवारस महिलेला मिळाले जीवनदान नागरिक, पोलीस, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून माणुसकीचे दर्शन
कराड : विद्या मोरे
शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि फुटपाथवर अनेक बेघर, निराधार आणि फिरस्ते नागरिक वास्तव्यास असतात. अनेकदा ते आपल्या नजरेसमोर असतात, पण त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र कराडमधील विजय दिवस चौक येथे घडलेल्या एका घटनेने माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय नागरिकांना दिला आहे.
विजय दिवस चौकातील शिवाजी हायस्कूलच्या भिंतीलगत गेल्या पंधरा दिवसांपासून एक वृद्ध महिला राहत होती. अंगावर जुने ब्लँकेट, उशाला एक पिशवी आणि बाजूला छोटी काठी एवढाच तिचा संसार होता. परिसरातील अनेक नागरिकांप्रमाणेच सामाजिक भान जपणारे शरद जगन्नाथ गाडे यांचीदेखील तिच्याकडे रोज नजर जात होती. सुरुवातीला ती बसलेल्या अवस्थेत दिसत होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून ती सतत पडून राहू लागली होती. तीव्र खोकला, अशक्तपणा आणि वाढती अस्वस्थता तिच्या प्रकृतीची गंभीरता दर्शवत होती.
गुरुवारी सायंकाळी शरद गाडे आणि त्यांच्या पत्नी सिग्नलवर थांबले असताना पुन्हा एकदा त्या महिलेकडे त्यांची नजर गेली. ती पूर्वीप्रमाणेच निपचित पडून होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि पावसाची शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी त्यांच्या पत्नींनी, "तिला दवाखान्यात तरी नेऊया," असे सुचवले.
घरी परतल्यानंतरही त्या महिलेची अवस्था त्यांच्या मनातून जात नव्हती. अचानक पाऊस आल्यास, तिला उठताही येत नसेल तर काय होईल, या विचाराने ते अस्वस्थ झाले. अखेर त्यांनी स्वतः पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला.
मदतीसाठी अनेक हात पुढे आले
शरद गाडे यांनी तातडीने पत्रकार मित्र एस. के. मामा यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता कमळेश्वर गणेश मंडळ, मंगळवार पेठ येथील कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दराडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. अवघ्या काही मिनिटांत पोलीस वाहन आणि ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनीही तातडीने आवश्यक सूचना देऊन मदतकार्याला गती दिली.
शेखर बर्गे यांच्या ॲम्ब्युलन्समधून संबंधित महिलेला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला ती व्यवस्थित माहिती देऊ शकत नव्हती. मात्र काही वेळानंतर तिने स्वतःचे नाव उज्वला विलास चौगुले असल्याचे सांगितले. ती पेठ वडगाव येथील असल्याचेही तिने नमूद केले. तिच्या बोलण्यातून तिला तीन मुली असल्याची माहिती समोर आली. मात्र तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था लक्षात घेता या माहितीची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नाही.
रुग्णालयातील तपासणीत तिची ऑक्सिजन पातळी कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अधिक उपचारांची गरज ओळखून डॉक्टरांनी तिला रात्री सव्वा अकराच्या सुमारास पुढील उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले.
एका निर्णयाने वाचला जीव
या संपूर्ण घटनेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वेळेत घेतलेला निर्णय. अनेक दिवस त्या महिलेकडे अनेकांची नजर गेली असेल; मात्र तिच्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचे धाडस शरद गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवले. त्यामुळेच तिला वैद्यकीय उपचार मिळू शकले.
"आज जर तिच्याकडे दुर्लक्ष केले असते, तर आयुष्यभर स्वतःलाच माफ करू शकलो नसतो," अशी भावना शरद जगन्नाथ गाडे यांनी व्यक्त केली.
माणुसकी अजूनही जिवंत आहे
या घटनेत शरद गाढे, त्यांच्या पत्नी, एस. के. मामा, कमळेश्वर गणेश मंडळाचे कार्यकर्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, शेखर बर्गे आणि मदतीसाठी तत्पर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेली संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
आज एका अनोळखी महिलेसाठी अनेक हात पुढे आले आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला.
आई-वडिलांना बेवारस होऊ देऊ नका
ज्यांनी आपल्याला चालायला शिकवले, स्वतः उपाशी राहून आपल्या तोंडात घास भरवला, त्या आई-वडिलांवर कधीही बेवारस होण्याची वेळ येऊ देऊ नका. म्हातारपणात पैशांपेक्षा आपल्या माणसांचा सहवास, आधार आणि प्रेम अधिक महत्त्वाचे असते. समाजातील प्रत्येकाने वृद्धांच्या वेदना समजून घेत संवेदनशीलतेने वागण्याची गरज आहे. कारण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अनेकदा फक्त एक फोन, एक मदतीचा हात आणि माणुसकीने भरलेले मन पुरेसे असते.
Comments
Post a Comment