पोलीस प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी; डी वाय एस पी कार्यालय व कराड शहर पोलिसांचा धडक प्रहार, १४ किलो गांज्या सह लाखोंचा मुद्देमाल जप्त
कराड::विद्या मोरे : सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून डीवायएसपी कार्यालय, कराड विभाग आणि कराड शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सैदापूर कॅनाल परिसरात धडक कारवाई करत तब्बल १४.०८२ किलो कॅनाबीस (गांजा) जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ३ लाख ९९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
• वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम :
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या.
• माहितीवरून कारवाईची सुरुवात :
दि. ८ जून रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोरख जिजाबा पवार (रा. वडोली निळेश्वर, ता. कराड; सध्या प्रथमेश कॉलनी, विद्यानगर, सैदापूर) हा इसम सैदापूर कॅनाल परिसरात गांजा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत आहे. या माहितीची खातरजमा करून तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
• संयुक्त पथकाची धडक कारवाई :
सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व कराड शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सैदापूर परिसरात सापळा रचून संशयितावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
• पहिल्या टप्प्यातील जप्ती :
छापा कारवाईत सुरुवातीला ६.०८२ किलो गांजा, एक सुझुकी अॅक्सेस दुचाकी व इतर साहित्य असा १ लाख ९९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
• चौकशीतून मोठा उलगडा :
ताब्यात घेतलेल्या आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी ८ किलो गांजाचा साठा पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे एकूण जप्त गांज्याचे प्रमाण १४.०८२ किलो इतके झाले असून मुद्देमालाची किंमत ३ लाख ९९ हजार १७५ रुपये इतकी निश्चित झाली आहे.
• गुन्हा दाखल व तपास सुरू :
या प्रकरणी पोलीस हवालदार सागर बर्गे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर करीत आहेत.
• साखळीचा शोध सुरू :
आरोपीकडे सखोल चौकशी सुरू असून गांजाचा पुरवठा करणारी व वितरण करणारी संपूर्ण साखळी (बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंक) उघड करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
• पथकाची कामगिरी :
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस हवालदार असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, मयूर देशमुख, हर्षल साळुंखे, महेश शिंदे व महेश पवार यांनी सहभाग घेतला.
Comments
Post a Comment