ज्ञान, नैतिकता आणि समाजाभिमुखतेची सांगड घालणारे वैद्यकीय शिक्षण ही आजची गरज : डॉ. अभिजात शेठ कृष्णा विश्व विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत सोहळा उत्साहात; ९७२ विद्यार्थ्यांना पदवी, ३३ जणांना पीएच.डी. प्रदान

 
कराड, ता. २९ : विद्या मोरे : आरोग्य क्षेत्रात कार्यरत प्रत्येक व्यक्तीकडे ज्ञान, चिकित्सक दृष्टिकोन, नैतिकता आणि जागतिक जबाबदारी या चारही मूल्यांचा समन्वय असणे आवश्यक आहे. पुढील वैद्यकीय शिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित, समाजाभिमुख आणि जागतिक दृष्टीकोन असलेले असावे, असे मत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनी व्यक्त केले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १४ व्या दीक्षांत सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.

उत्साहपूर्ण वातावरणात दीक्षांत सोहळा

कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात दीक्षांत सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पोलिस बँड पथकाच्या मानवंदनेनंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, विनायक भोसले, डॉ. हरी वासुदेवन, दिलीप पाटील, पी. डी. जॉन, डॉ. ज्योत्स्ना पाटील, डॉ. एम. व्ही. घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

९७२ विद्यार्थ्यांना पदवी; २६ गुणवंतांचा गौरव

या वेळी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील ९७२ विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली. त्यापैकी ३३ संशोधकांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी देण्यात आली. विविध अधिविभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २६ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष पदकांनी गौरव करण्यात आला.

शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नाही

डॉ. अभिजात शेठ म्हणाले, दीक्षांत समारंभ हा केवळ पदवी प्रदान करण्याचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे केलेल्या परिश्रमांचा सन्मान आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळविणे नसून व्यक्तिमत्त्व घडविणे आणि समाजासाठी सक्षम नागरिक घडविणे हा आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला सन्मान, प्रतिष्ठा आणि स्वाभिमानाने जगण्याची संधी शिक्षणातून मिळते.

ते पुढे म्हणाले, वैद्यकीय शिक्षण देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या सक्षम आरोग्यसेवकांची निर्मिती करते. त्यामुळे ज्ञानासोबत संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव ही मूल्येही तितक्याच गांभीर्याने जोपासली गेली पाहिजेत.
संशोधन आणि नवोन्मेषावर विद्यापीठाचा भर : डॉ. सुरेश भोसले

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश भोसले म्हणाले, पारंपरिक शिक्षणपद्धतीपेक्षा आता समुदायाभिमुख शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. कृष्णा विश्व विद्यापीठ संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक ज्ञाननिर्मितीला प्राधान्य देत आहे. यंदा संशोधन प्रकल्प आणि पेटंट्समध्ये लक्षणीय वाढ झाली असून, वैद्यकीय शिक्षणासाठी जागतिक स्तरावर आदर्श ठरेल असे शैक्षणिक मॉडेल विकसित करण्याचे विद्यापीठाचे ध्येय आहे.

तंत्रज्ञानासोबत माणुसकीही तितकीच महत्त्वाची

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, रोबोटिक मेडिसिन, प्रिसिजन मेडिसिन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अ‍ॅनालिटिक्समुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. मात्र, तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना रुग्णांप्रती करुणा, सहानुभूती आणि मानवी मूल्ये जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा

कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांनी विद्यापीठाच्या गेल्या वर्षातील शैक्षणिक, संशोधन आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, विद्यापीठाचे अधिष्ठाते, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

'कृष्णा' देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ; डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाचे डॉ. अभिजात शेठ यांच्याकडून कौतुक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनी आपल्या भाषणात कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे, अत्याधुनिक पायाभूत सुविधांचे आणि संशोधनाभिमुख वाटचालीचे विशेष कौतुक केले.

ते म्हणाले, "कृष्णा विश्व विद्यापीठ हे देशातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षणासाठी ओळखले जाणारे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले हे केवळ उत्कृष्ट डॉक्टर नाहीत, तर प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणारे, परिपूर्णतेचा ध्यास असलेले आणि दूरदृष्टीने नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे."

डॉ. अभिजात शेठ यांच्या या गौरवोद्गारांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार