भाजपा दिशेने मोठी राजकीय हालचाल; भरत पाटील (नाना) व अनिल बापू यांच्यात बंद खोलीत सविस्तर चर्चा
कराड : विद्या मोरे
महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव तथा राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (नवी दिल्ली) संचालक भरत पाटील (नाना) आणि शेतकरी संघटना तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू यांच्यात आज अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक स्वरूपाची बंद खोलीतील बैठक पार पडली.
ही बैठक काही काळ गोपनीय ठेवण्यात आली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीर्घ वेळ चाललेल्या या चर्चेत स्थानिक तसेच राज्यस्तरीय राजकीय घडामोडी, संघटनात्मक विस्तार, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती यावर सविस्तर विचारविनिमय झाल्याची माहिती मिळत आहे.
या चर्चेत विशेषतः ग्रामीण भागातील संघटन मजबूत करणे, शेतकरी प्रश्नांवरील भूमिका, तसेच सामाजिक संघटनांना राजकीय प्रवाहात अधिक प्रभावीपणे कसे जोडता येईल यावर भर देण्यात आल्याचे समजते. दोन्ही नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांना प्राधान्य देत पुढील दिशा ठरवण्यावरही चर्चा केल्याची माहिती आहे.
दरम्यान, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अनिल बापू भाजपच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा अधिक जोर धरू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घडामोडीकडे जिल्ह्यातील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले असून पुढील काही दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment