‘कृष्णा’च्या रणधुमाळीत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; दहा वर्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परिवर्तनाची गर्जना – शशिकांत शिंदे : कालेतील सभेत जोरदार प्रचार; “दहा वर्षे झोपा काढल्या का?” असा अविनाश मोहितेंचा थेट सवाल

 
काले, ता. कराड : विद्या मोरे 

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनेलच्या बाजूने वातावरण असून, सभासदांनी परिवर्तन घडविल्यास तो निर्णय महाराष्ट्राच्या सहकार चळवळीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

काले येथे झालेल्या जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी निवास देसाई होते. यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, बंडानाना जगताप, अजितराव पाटील-चिखलीकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सहकाराच्या मूल्यांचा वारसा जपण्याचे आवाहन

शशिकांत शिंदे म्हणाले, सहकार क्षेत्रातील मूल्ये, तत्त्वे आणि क्रांतिकारकांचा वारसा जपण्याची जबाबदारी सभासदांवर आहे. इतिहास घडविण्याची संधी वारंवार मिळत नाही. संस्थापक पॅनेलचे उमेदवार सामान्य कुटुंबांतील असून, सभासदांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, सत्ता नसतानाही विचारांसाठी संघर्ष करणारे कार्यकर्तेच खऱ्या अर्थाने निष्ठावान असतात. कृष्णा कारखान्यातील निवडणुकीचा निकाल राज्यातील सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाचा संदेश देणारा ठरेल.

अविनाश मोहितेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी आपल्या कार्यकाळातील कामगिरीचा आढावा घेताना ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा तब्बल ३४१ कोटी रुपये अधिक दर दिल्याचा दावा केला. वेळेवर ऊसतोड, सिंचन योजनांचे व्यवस्थापन, डिस्टिलरीतील वाढलेला नफा आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीचे प्रयत्न यांचा त्यांनी उल्लेख केला.

सध्या कारखान्यावर ९७७ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा मुद्दा उपस्थित करत, हा कारभार आदर्श कसा म्हणायचा, असा सवाल त्यांनी केला. “नवीन पाणी योजनांची आश्वासने देता, पण सध्याच्या योजना बंद का आहेत? गेल्या दहा वर्षांत तुम्ही नेमके काय केले?” असा थेट प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.

अजितराव पाटील-चिखलीकर यांनी सत्ताधाऱ्यांवर फुकटच्या प्रसिद्धीचे राजकारण केल्याचा आरोप केला. कारखान्यातील उपपदार्थांमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असताना शेतकऱ्यांना चार हजार रुपये ऊसदर देता आला असता, असे ते म्हणाले.

कारखान्याची निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे तर सभासदांच्या स्वाभिमानाची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

बोगस सभासदांमुळे आर्थिक गळतीचा आरोप

बंडानाना जगताप यांनी कारखान्यात ८ ते ९ हजार बोगस सभासद असल्याचा आरोप करत, त्यांची साखर बंद केल्यास सभासदांना अधिक लाभ देता येईल, असे मत मांडले. आर्थिक गळती थांबविल्यास सभासदांना अधिक दर देणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखाना खाजगी करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकरी संघटनेचा इशारा

विजय पाटील यांनी सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याचे सांगितले. सहकार वाचविण्याची भाषा करणारेच आज वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभे असल्याची टीका त्यांनी केली. आगामी निवडणुकीत परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेत इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. मोठ्या संख्येने सभासद, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार हर्षवर्धन पाटील यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार