आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अंजली वेताळची कांस्य पदकावर मोहोर; भारताची मान उंचावली
कराड, दि.१: विद्या मोरे ; थायलंड येथे पार पडलेल्या १५ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विद्यानगर (ता. कराड) येथील सद्गुरू गाडगे महाराज माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी पै. अंजली वेताळ हिने ६२ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय यशामुळे कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत अंजलीसमोर मंगोलियाच्या खोन्जोरुल ओचीर हिचे आव्हान होते. सुरुवातीच्या शिट्टीपासूनच अंजलीने आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्धीवर दबाव निर्माण केला. तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट खेळ आणि वेगवान चालींच्या जोरावर तिने गुणफलक सतत हलता ठेवला. अखेर १५-२ अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवत अंजलीने कांस्यपदकावर आपले नाव कोरले आणि भारताच्या पदकात मोलाची भर घातली.
अंजलीला मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलात प्रशिक्षक दादासाहेब लवटे व दयानंद खतकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. कठोर सराव, जिद्द आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर तिने हे आंतरराष्ट्रीय यश संपादन केले. तिच्या या यशामध्ये वडील पै. संतोष वेताळ यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.
अंजलीच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, कोल्हापूर शिक्षण विभागाच्या उपसंचालक प्रभावती कोळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी तेजस गंभरे, वेतन अधीक्षक सुनील शिखरे, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, डॉ. मोहन राजमाने, विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन पवार, संस्थेचे अध्यक्ष उदय थोरात, क्रीडा विभाग प्रमुख विद्या पाटील व सचिन चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच सैदापूर व सुर्ली येथील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment