आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अर्थ पुरवठ्यासाठी पतसंस्थांचाही पर्याय विचाराधीन मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; ग्रामीण भागातील उद्योजकांना जलद आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासन सकारात्मक

 फोटो : मुंबई : मंत्रालयातील बैठकीत आ. डॉ. अतुलबाबा भोसले; समवेत डॉ. पंकज भोयर, नरेंद्र पाटील व अधिकारी.
कराड, दि. ६ :  विद्या मोरे ; मराठा समाजातील होतकरू तरुण उद्योजकांना उद्योग-व्यवसायासाठी अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वाचे यश मिळाले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या अर्थपुरवठ्याची प्रक्रिया केवळ बँकांपुरती मर्यादित न ठेवता, शासनाचे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र व सक्षम पतसंस्थांमार्फतही राबविण्याचा पर्याय शासनाच्या गंभीर विचाराधीन असल्याचे मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत स्पष्ट झाले.

मुख्यमंत्र्यांकडे मांडली होती मागणी

मराठा समाजातील हजारो युवकांना उद्योग उभारणीसाठी वेळेत आर्थिक सहाय्य मिळण्यात अडचणी येत असल्याची बाब आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती. कर्ज वितरण आणि व्याज परताव्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी पात्र पतसंस्थांनाही या योजनेत सहभागी करून घ्यावे, अशी त्यांनी ठोस मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मंत्रालयात बैठक

मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत संबंधित विभागांना तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

पतसंस्थांमार्फत अर्थपुरवठ्यावर सकारात्मक चर्चा

बैठकीत शासनाचे निकष पूर्ण करणाऱ्या सक्षम व पात्र पतसंस्थांमार्फत कर्ज वितरण आणि व्याज परताव्याची प्रक्रिया राबविण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. हा पर्याय स्वीकारल्यास ग्रामीण भागातील उद्योजकांना अधिक वेगाने आणि सुलभ पद्धतीने आर्थिक सहाय्य उपलब्ध होऊ शकणार असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

ग्रामीण उद्योजकांना मोठा दिलासा

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी बैठकीत सांगितले की, अनेक ग्रामीण भागांमध्ये बँकांच्या प्रक्रियेमुळे कर्ज मंजुरीला विलंब होतो. पतसंस्थांनाही या योजनेत सहभागी करून घेतल्यास हजारो होतकरू युवकांना कमी कालावधीत अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीलाही मोठी गती मिळेल.

शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन

सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बैठकीत राज्य शासन तरुण उद्योजकांना अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

बैठकीत कर्ज मंजुरीची प्रक्रिया, अर्ज पडताळणी, व्याज परतावा, निधी वितरणातील विलंब तसेच लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यावरही सखोल चर्चा करण्यात आली. भविष्यात संपूर्ण प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारमंथन झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध प्रशासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

"अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत अर्थपुरवठा सक्षम व पात्र पतसंस्थांमार्फतही सुरू झाल्यास राज्यातील हजारो तरुण उद्योजकांना कमी वेळेत आर्थिक सहाय्य मिळेल. उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीलाही मोठी गती मिळेल."

– आ. डॉ. अतुलबाबा भोसले

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार