कराडच्या कृष्णा पुलावर धावत्या कारने घेतला अचानक पेट; क्षणार्धात जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळलीरात्रीची थरारक घटना; चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला, काही काळ वाहतूक विस्कळीत
कराड, ता. ०९ : विद्या मोरे ; कराड शहरातील कृष्णा पुलावर गुरुवारी रात्री धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत संपूर्ण कारला वेढा घातला. पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी ही घटना पाहताच वाहनांची रांग लागली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून वाहन तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवले आणि बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला कवेत घेतले. त्यामुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे कृष्णा पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किट अथवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment