श्रीराम मंदिर देणगी कथित गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस आक्रमक; साताऱ्यात 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह, पोलीस ठाण्यात निवेदन

 
कराड दि.१०: विद्या मोरे ; अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष, पारदर्शक आणि न्याय्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी सातारा येथील श्री हनुमान मंदिर परिसरात 'रघुपती राघव राजाराम' भजनाच्या माध्यमातून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सातारा शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
रामभक्तांच्या श्रद्धेशी संबंधित विषय

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले की, श्रीराम मंदिर उभारणीसाठी देशभरातील कोट्यवधी भाविकांनी श्रद्धेने रोख रक्कम, सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचे दान केले आहे. या देणग्यांबाबत समोर आलेल्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून हा विषय केवळ आर्थिक अनियमिततेचा नसून कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धा आणि विश्वासाशी निगडित आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

कथित गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच चौकशी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवून जनतेचा विश्वास कायम राखावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. श्रद्धेच्या नावाने जमा झालेल्या देणगीचा योग्य वापर होणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

पोलीस ठाण्यात निवेदन सादर

सत्याग्रह आंदोलनानंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन सादर केले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच चौकशीचा अहवाल सार्वजनिक करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदामाई पाटील, पंचायत समिती सदस्य रवी बडेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमाराजे घोरपडे, प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम, रफिकभाई, अन्वरभाई, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, एससी विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, मनोजकुमार तपासे, कराड दक्षिण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली जाधव, मनीषा साळुंखे, रजनी पवार, धनश्री महाडिक, प्रदीप जाधव, दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार