कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा विश्व विद्यापीठात ‘स्पाईन कॉन-२०२६’; देश-विदेशातील तज्ज्ञांची उपस्थिती ● २० व २१ जुलै रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद व प्रत्यक्ष शस्त्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन


कराड, दि. १८ : विद्या मोरे ; कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा विश्व विद्यापीठात दि. २० व २१ जुलै रोजी ‘के.व्ही.व्ही.आय.एन.एस. स्पाईन कॉन-२०२६’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे व प्रत्यक्ष शस्त्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस (KVVINS) आणि कृष्णा हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेत ‘कंबरेच्या मणक्याविषयी ३६० अंशांचा सर्वांगीण दृष्टिकोन’ या संकल्पनेवर देश-विदेशातील नामवंत स्पाईन सर्जन मार्गदर्शन करणार असून, अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आधुनिक स्पाईन उपचारांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

परिषदेची माहिती देताना आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. जी. व्ही. रामदास यांनी सांगितले की, कंबरदुखी हा जगभरातील सर्वाधिक त्रासदायक आणि अपंगत्व निर्माण करणाऱ्या आजारांपैकी एक आहे. बहुतांश रुग्णांना औषधोपचार, फिजिओथेरपी, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांमुळे आराम मिळतो. मात्र, मज्जातंतूंवर दाब येणे, पायात कमजोरी निर्माण होणे, असह्य वेदना किंवा मणक्याची अस्थिरता यांसारख्या गंभीर अवस्थेत शस्त्रक्रिया आवश्यक ठरते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित

पूर्वी मणक्याच्या शस्त्रक्रिया म्हणजे मोठी जखम, जास्त रक्तस्राव आणि दीर्घ विश्रांती अशी भीती रुग्णांच्या मनात होती. मात्र, गेल्या दोन दशकांत एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी, उच्च दर्जाची मायक्रोस्कोपी, अत्याधुनिक इम्प्लांट्स, प्रगत इमेजिंग प्रणाली आणि सुरक्षित भूलतंत्रामुळे मणक्यावरील शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, अचूक आणि परिणामकारक झाल्या आहेत.

तरुण स्पाईन सर्जनना मिळणार प्रत्यक्ष प्रशिक्षण

या परिषदेत देश-विदेशातील अनुभवी स्पाईन सर्जनांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रात्यक्षिक, वैज्ञानिक चर्चासत्रे आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. त्यामुळे तरुण स्पाईन सर्जनना आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवण्याची आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

रुग्णांसाठीही ठरणार लाभदायी

आधुनिक स्पाईन शस्त्रक्रियेमुळे कमी रक्तस्राव, कमी वेदना, संसर्गाचा धोका कमी, रुग्णालयातील मुक्काम कमी आणि शस्त्रक्रियेनंतर अल्पावधीतच रुग्ण पूर्ववत दैनंदिन जीवनात परतू शकतो. या आधुनिक उपचारपद्धतींचा अधिकाधिक डॉक्टरांना लाभ व्हावा आणि त्याद्वारे रुग्णांना जागतिक दर्जाची उपचार सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. रामदास यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार