डॉ. संग्राम धुमाळ यांचा नागरी सत्कार; कृषी शिक्षणाला नवी दिशा देण्याचा निर्धार
कराड, दि. १४ जुलै : विद्या मोरे यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय, कराडच्या सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्यपदी डॉ. संग्राम धुमाळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल कराड तालुक्यातील यशवंतप्रेमी शेतकरी व शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या वतीने हॉटेल विट्स सत्यजीत येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला कृषी, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह प्रगतशील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीशराव इंगवले, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, आरपीआयचे सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड तसेच महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य तथा माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्रगतीचा विश्वास
प्रास्ताविकात प्रकाश पाटील यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची वाटचाल, महाविद्यालयाची प्रगती आणि डॉ. संग्राम धुमाळ यांचे शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय योगदान अधोरेखित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय राज्यातील आदर्श कृषी शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकरीहिताचे उपक्रम राबविण्याची अपेक्षा
नामदेव पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासवर्ग व प्रशिक्षण कार्यशाळा नियमित आयोजित करण्याची सूचना केली. सचिन नलवडे यांनी शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाने शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व संशोधनाचा लाभ द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विकासासाठी सहकार्याचे आश्वासन
सुनंदा पाटील यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत आवश्यक प्रस्ताव सादर झाल्यास त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. संस्थापक प्राचार्य डॉ. शिवाजीराव पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कृषी शिक्षणाविषयीच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला.
'उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ'
सत्काराला उत्तर देताना डॉ. संग्राम धुमाळ यांनी उपस्थित मान्यवर, शेतकरी व आयोजकांचे आभार मानले. "उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ" या तत्त्वावर विश्वास ठेवत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अत्याधुनिक संशोधन व आधुनिक कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाविद्यालयाला राज्यात अग्रस्थानी नेण्याचा संकल्प
आदरणीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय, कराड हे महाराष्ट्रातील अग्रगण्य शासकीय कृषी महाविद्यालय म्हणून विकसित करण्याचा दृढ संकल्प डॉ. धुमाळ यांनी व्यक्त केला.
उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमास तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, कृषी तज्ज्ञ, विविध संघटनांचे पदाधिकारी, कृषीप्रेमी नागरिक व महाविद्यालयाचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सत्कार समारंभातून कृषी शिक्षण व शेतकरी विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment