सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून कराडमध्ये ऑलिम्पिक वीरांना अनोखी मानवंदना; २६ पदक विजेत्यांचे छायाचित्र प्रदर्शन व खाशाबा जाधव पुस्तिकेचे वितरण
*कराड, दि. ४ : विद्या मोरे* जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून कराड येथील तहसीलदार कार्यालयासमोर भारताच्या २६ ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना अनोख्या पद्धतीने मानवंदना अर्पण करण्यात आली. सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमांतर्गत सर्व पदक विजेत्या खेळाडूंच्या छायाचित्रांचा आकर्षक फ्लेक्स उभारण्यात आला. भारतीय क्रीडा इतिहासाचा गौरव नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि युवा पिढीला ऑलिम्पिक वीरांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
• प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी भारताच्या ऑलिम्पिक इतिहासाचा आढावा घेत विविध पदक विजेत्या खेळाडूंच्या कर्तृत्वाला अभिवादन केले. तहसीलदार कार्यालयासमोर उभारलेल्या या छायाचित्र प्रदर्शनाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
• यावेळी भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित 'ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव' या माहितीपर पुस्तिकेचेही उपस्थितांना वितरण करण्यात आले. त्यांच्या कार्याची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
• याच उपक्रमाच्या माध्यमातून कराडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 'स्व. संपतराव पाटील तालुका लोकशाही दिन' या जनजागृती अभियानाचीही माहिती देण्यात आली. सामाजिक प्रश्न, लोकहिताच्या मागण्या तसेच प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
• लोकशाही मार्गाने नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे, सार्वजनिक हिताच्या विषयांवर जनजागृती करणे आणि समाजामध्ये राष्ट्रीय तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे, या उद्देशाने सचिन पाटील यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने आयोजित केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
• उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत भारतीय ऑलिम्पिक वीरांच्या कार्याला अभिवादन केले. क्रीडा संस्कृतीला चालना देणारे आणि समाजात जनजागृती घडवून आणणारे असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात व्हावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment