४१ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! खोडशी गेटेड बंधाऱ्यासाठी ₹ २.६४ कोटींचा निधी; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी; उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश


कराड, ता. २७ : विद्या मोरे;   कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खोडशी (ता. कराड) येथील कृष्णा नदीवरील नवीन गेटेड बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी राज्य सरकारने ₹२ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा निर्णय घेतला असून, प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

४१ वर्षांपासून रखडलेले काम अखेर मार्गी

खोडशी गावाजवळील कृष्णा नदीवर ब्रिटिश काळात सन १८६७ मध्ये बंधारा उभारण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे कृष्णा कालव्याद्वारे कराड, वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यातील सुमारे ८,९७२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. मात्र जुन्या बंधाऱ्याचे आयुष्यमान संपत आल्याने १९८५ मध्ये नवीन गेटेड बंधाऱ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. चार दशकांहून अधिक काळ लोटूनही हे काम अपूर्ण राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम होती.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

उर्वरित कामासाठी निधी मिळावा यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेत मागणी केली. याशिवाय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच अखेर निधी मंजूर झाला.

जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष पाहणी; तातडीचे आदेश

कराड दौऱ्यावर आलेल्या जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खोडशी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा आढावा घेत त्यांनी उर्वरित कामासाठी ₹२.६४ कोटींचा निधी मंजूर करत संबंधित अधिकाऱ्यांना काम कोणताही विलंब न लावता युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

हजारो शेतकऱ्यांना होणार थेट लाभ

बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कृष्णा कालव्याद्वारे होणारा पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे कराड, वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला अधिक विश्वासार्ह सिंचन उपलब्ध होणार असून शेती उत्पादनातही वाढ होण्यास मदत मिळणार आहे.

१५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता

सध्या या कालव्याद्वारे सुमारे ८,९७२ हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. बंधाऱ्याचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता या प्रकल्पात निर्माण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुलंद आवाज

खोडशी गेटेड बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी निधी मिळावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी २५ फेब्रुवारी रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून हा विषय प्राधान्याने लावून धरला. अखेर शासनाने निधी मंजूर करून या पाठपुराव्याला यश दिले.

प्रतिक्रिया

"सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खोडशी गेटेड बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ₹२.६४ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि हजारो शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होईल."

आ. डॉ. अतुलबाबा भोसले

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार