कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले; व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांची बिनविरोध निवड ; निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अपर्णा यादव यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार; सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदाची ऐतिहासिक हॅट्रिक, कार्यकर्त्यांचा जल्लोष
कराड ता. ८ : विद्या मोरे; यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले, तर व्हाईस चेअरमनपदी वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील संचालक जे. डी. मोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच कारखाना परिसरात जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
● विक्रमी विजयानंतर पुन्हा नेतृत्वावर शिक्कामोर्तब
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने सर्व २१ जागांवर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली. या ऐतिहासिक विजयानंतर आज झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीतही संचालक मंडळाने डॉ. सुरेश भोसले आणि जे. डी. मोरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला.
● खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड
कारखाना कार्यस्थळी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अपर्णा यादव यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. चेअरमनपदासाठी डॉ. सुरेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जाचे सूचक म्हणून माजी व्हाईस चेअरमन तथा संचालक जगदीश जगताप, तर अनुमोदक म्हणून संचालक दयानंद पाटील यांनी भूमिका बजावली. व्हाईस चेअरमनपदासाठी जे. डी. मोरे यांच्या अर्जाचे सूचक संचालक सुनील पाटील, तर अनुमोदक संचालक सत्यजीत पाटील होते. त्यानंतर दोघांचीही सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
● सौ. अपर्णा यादव यांच्या हस्ते सत्कार
निवड जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अपर्णा यादव यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक संजय जाधव, राहुल देशमुख, उर्मिला राजमाने तसेच संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.
● सभासदांचा विश्वास सार्थ ठरविणार – डॉ. सुरेश भोसले
यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, "कृष्णा कारखान्याच्या सभासदांनी सलग तिसऱ्यांदा आमच्यावर विश्वास दाखविला आहे. येत्या पाच वर्षांत सभासदांना अधिकाधिक ऊसदर, आधुनिक सुविधा आणि विकासाभिमुख निर्णय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कृष्णा कारखान्याला राज्यातील आदर्श व पथदर्शी सहकारी साखर कारखाना बनविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करू."
● मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
यावेळी संचालक जगदीश जगताप, लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, आनंदा खबाले, अरविंद पाटील, बाजीराव थोरात, छबन कांबळे, दत्तात्रय देसाई, संभाजीराव पाटील, सत्यजीत पाटील, सुनील पाटील, बाळासो जगताप, संग्राम पाटील, बाबासो शिंदे, अविनाश खरात, बाजीराव निकम, सुजाता जाधव, सुनीता शेवाळे, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्यासह कराड व वाळवा तालुक्यातील मान्यवर, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
■ विशेष : डॉ. सुरेश भोसले यांच्या नावावर आणखी एक ऐतिहासिक विक्रम
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९६१ ते १९८९ या सलग २८ वर्षांच्या कार्यकाळात कृष्णा कारखान्याचे चेअरमनपद भूषवून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनी १९९९ ते २००५ आणि २०१५ ते २०२६ असा एकूण १७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, आता २०२६ ते २०३१ या नव्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची पुन्हा निवड झाली आहे. त्यामुळे आप्पासाहेबांनंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा तसेच सर्वाधिक वेळा चेअरमन म्हणून निवड होण्याचा मान डॉ. सुरेश भोसले यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवड होऊन त्यांनी ऐतिहासिक हॅट्रिक पूर्ण केली आहे.
Comments
Post a Comment