वारकऱ्यांसाठी ‘कृष्णा’ ठरली आरोग्यदूत; रौप्यमहोत्सवी वर्षात दोन हजारांहून अधिक भाविकांना मोफत उपचारगेली २५ वर्षे अखंड सेवाभावाची परंपरा; पंढरपूर वारी मार्गावर मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि फिजिओथेरपीची सुविधा
कराड : विद्या मोरे
वारकऱ्यांच्या सेवेसाठी कृष्णाची सामाजिक बांधिलकी
आषाढी वारीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी मार्गक्रमण करतात. या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत कृष्णा हॉस्पिटलने यंदाही आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. ‘आरोग्य वारी’ उपक्रमांतर्गत दोन हजारांहून अधिक वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देत संस्थेने सेवाभावाची परंपरा कायम राखली. यंदा या उपक्रमाने रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण केले असून, सलग २५ वर्षे सुरू असलेल्या या सेवाकार्याचे वारकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
२५ वर्षांची अखंड आरोग्यसेवा
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेल्या पावशतकापासून सातत्याने राबविला जात आहे. वारी मार्गावर उभारलेल्या आरोग्य केंद्रांमधून अनुभवी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत देत होते.
मोफत तपासणी, औषधे आणि फिजिओथेरपीची सुविधा
वारीदरम्यान ताप, थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी, पायांची सूज यांसारख्या तक्रारींवर त्वरित उपचार करण्यात आले. आवश्यकतेनुसार मोफत औषधे, मलमपट्टी तसेच फिजिओथेरपीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. या आरोग्य सेवेचा लाभ घेत अनेक वारकऱ्यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
सेवाभावी वैद्यकीय पथकाची मोलाची भूमिका
दहा दिवस चाललेल्या या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जगताप, कॅम्प सुपरवायझर सुनील यादव, डॉ. पृथा जावकर, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. अभिषेक बारी, डॉ. सिद्धार्थ आहेर, डॉ. साक्षी बोराटे, डॉ. समीक्षा पाटील यांच्यासह विशाल मोहिते, रिमा मोहिते, उषा सोनार, संभाजी देसाई, स्मिता पाटील, चंद्रकांत चव्हाण आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांनी सेवाभावाने सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी केला.
Comments
Post a Comment