डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा जागर कराड मध्ये भाजप महिला मोर्चाचे युवती संमेलन उत्साहात राष्ट्रभक्ती, महिला सक्षमीकरण आणि युवाशक्तीवर भरनीता केळकर यांचे राष्ट्रनिर्माणा साठी युवतींना प्रेरणादायी मार्गदर्शन

कराड, ता. ३ : विद्या मोरे

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, सातारा जिल्ह्याच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मरण पक्षानिमित्त कराड येथे आयोजित करण्यात आलेले युवती संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राष्ट्रभक्ती, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणात युवतींची भूमिका या विषयांवर आयोजित या संमेलनात भाजप महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांनी युवतींना मार्गदर्शन करताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रवादी विचारांचा वारसा जतन करण्याचे आवाहन केले.

'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी : जीवन, कार्य आणि राष्ट्रनिर्माणातील योगदान' या विषयावर बोलताना नीता केळकर म्हणाल्या, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या एकात्मतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. अखंड भारताचे स्वप्न त्यांनी आपल्या विचारांतून आणि कृतीतून जपले. 'एक देश में दो निशान, दो विधान, दो प्रधान नहीं चलेंगे' ही त्यांची घोषणा केवळ घोषवाक्य नव्हती, तर देशाच्या अखंडतेसाठीचा निर्धार होता. त्यांच्या राष्ट्रवादी विचारांनी आजही देशातील लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, डॉ. मुखर्जी यांनी पाहिलेली अनेक स्वप्ने आज प्रत्यक्षात साकार होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची उभारणीही त्यांच्या विचारांना अभिवादन करणारी ऐतिहासिक घटना ठरली. भारताला आत्मनिर्भर, सक्षम आणि जागतिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने केंद्र सरकार प्रभावीपणे काम करत आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आणि युवतींना सक्षम करण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जात असून महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भाजप महिला मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्षा तेजस्विनी घोरपडे यांनी युवतींना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात प्रत्येक युवतीने शिक्षणाबरोबरच आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक जाणीव विकसित केली पाहिजे. सशक्त मन आणि सशक्त शरीर ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. राष्ट्र आणि समाजाप्रती आपले कर्तव्य ओळखून प्रत्येक युवतीने समाजकार्यात सहभागी व्हावे. भावी पिढीवर उत्तम संस्कार घडविणे आणि सक्षम समाज घडविण्यात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले होत्या. व्यासपीठावर डॉ. भारती पाटील, कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, ऐश्वर्यादेवी पाटणकर तसेच भाजप शहराध्यक्षा सुषमा लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. भारती पाटील, सुनील भिलारे, पैलवान धनंजय पाटील आणि माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कराड दक्षिण महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीता जाधव, नगरसेविका किशोरी शिंदे, वर्षा वास्के यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्त्या आणि कराड शहर व परिसरातील मोठ्या संख्येने युवती व महिला उपस्थित होत्या. राष्ट्रभक्तीचा संदेश, महिला सक्षमीकरणाची प्रेरणा आणि युवतींमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना जागृत करणारे हे संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार