गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यापासून नक्षलग्रस्त गडचिरोलीतील परिवर्तनाचा शिल्पकार; उदय जगताप यांनी समाजसेवेचा घडवला नवा आदर्शकैद्यांचे पुनर्वसन, नक्षल पीडित मुलांचे शिक्षण, शरणागत नक्षलवाद्यांना नवी दिशा आणि शांततेचा जागतिक संदेश; ‘आदर्श मित्र मंडळा’च्या कार्याची देशभरात दखल
कराड ; विद्या मोरे ; समाजकार्यासाठी मोठे पद, अफाट संपत्ती किंवा राजकीय पाठबळ आवश्यक नसते; आवश्यक असते ती समाजाविषयीची तळमळ, सकारात्मक विचार आणि सातत्याने काम करण्याची जिद्द. या विचाराला आपल्या कार्यातून साकार रूप देणारे नाव म्हणजे उदय जगताप. पुण्यातील धनकवडी परिसरातील गणेशोत्सव मंडळाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या दुर्गम भागात परिवर्तनाची चळवळ ठरला आहे. त्यांच्या ‘आदर्श मित्र मंडळ’ या संस्थेने गेल्या काही वर्षांत शिक्षण, पुनर्वसन, आरोग्य, शांतता आणि सामाजिक सलोखा या क्षेत्रात केलेले कार्य राज्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
गणेशोत्सवातून सुरू झाला समाजपरिवर्तनाचा प्रवास
गणेशोत्सवात कार्यरत असलेल्या तरुणांची ऊर्जा केवळ मंडप उभारणे, मिरवणुका आणि उत्सव यापुरती मर्यादित राहू नये, तर ती समाजाच्या उभारणीसाठी वापरली जावी, या विचारातून उदय जगताप यांनी मित्रांसह ‘आदर्श मित्र मंडळ’ स्थापन केले. मंडळाने कोणाकडूनही वर्गणी न घेता स्वावलंबी पद्धतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सुरू झालेल्या या उपक्रमाने पुढे व्यापक चळवळीचे स्वरूप धारण केले.
कैद्यांच्या आयुष्यात घडवला आशेचा किरण
समाजाने एकदा गुन्हेगार ठरवलेल्या व्यक्तींनाही नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळाली पाहिजे, या विश्वासातून उदय जगताप यांनी पुणे कारागृहात जाऊन तब्बल अडीच हजारांहून अधिक कैद्यांशी संवाद साधला. त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून पुनर्वसनासाठी प्रयत्न केले. शिक्षा पूर्ण करून बाहेर आलेल्या २६ जणांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. याचबरोबर त्या कैद्यांच्या ५० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्यांचे भविष्य घडविण्याचा ध्यास घेतला.
नक्षलग्रस्त गडचिरोलीकडे धाडसी वाटचाल
गुन्हेगारीनंतर उदय जगताप यांनी लक्ष केंद्रित केले ते नक्षलग्रस्त गडचिरोलीवर. नक्षलवादामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी केला. सुरुवातीला पोलिस प्रशासनानेही सुरक्षेच्या कारणास्तव चिंता व्यक्त केली; मात्र सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर त्यांना पोलिसांच्या सहकार्याने काम करण्याची संधी मिळाली.
नक्षलपीडित मुलांसाठी शिक्षणाची नवी वाट
गडचिरोलीतील दुर्गम भागात नक्षलवादाच्या छायेत वाढणाऱ्या मुलांसाठी शिक्षण ही मोठी समस्या होती. अनेक विद्यार्थ्यांना जंगलातून अनेक किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागत होते. अशा मुलांना सायकली, दप्तर, चपला आणि शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यात आला. शहीद जवानांच्या कुटुंबांतील तसेच नक्षलपीडित कुटुंबांतील ५० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मंडळाने स्वीकारली.
शरणागत नक्षलवाद्यांसाठी ‘शांतिनिकेतन’
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबातील मुलांसाठी ‘शांतिनिकेतन’ शाळेची स्थापना करण्यात आली. शरणागत नक्षलवाद्यांना गांधी विचारांवर आधारित समुपदेशन देण्यात आले. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांची परीक्षा घेण्यात आली. अनेकांनी यशस्वीपणे ती पूर्ण करत हिंसेऐवजी शांततेचा मार्ग स्वीकारला.
पोलिस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे पूल
नक्षलग्रस्त भागात पोलिस आणि नागरिक यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी ३३ पोलिस ठाण्यांमध्ये ग्रंथालये सुरू करण्यात आली. पुण्यातील युवकांच्या सहकार्याने साडेतेरा हजारांहून अधिक पुस्तके गडचिरोलीत पोहोचविण्यात आली. दुर्गम गावांमध्ये ‘खाट लायब्ररी’सारखा अभिनव उपक्रमही राबविण्यात आला. पुस्तकांच्या माध्यमातून समाज आणि पोलिस यांच्यातील संवाद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सोलर ऊर्जा, ई-लर्निंग आणि आरोग्य सुविधा
वीज नसलेल्या दुर्गम गावांमध्ये सोलर प्रणाली उभारण्यात आली. अनेक शाळांमध्ये ई-लर्निंगची संकल्पना पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले. दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून दुचाकी अॅम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले.
शांततेचा संदेश जगापर्यंत
३ मार्च २०१८ रोजी गडचिरोलीत सात हजार नागरिकांनी एकत्र येऊन शांततेचा संदेश दिला. या ऐतिहासिक उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने दखल घेतली. हा विक्रम केवळ संख्येचा नव्हता, तर हिंसेवर मानवतेच्या विजयाचा संदेश देणारा होता.
प्रेरणादायी कार्याची देशभरात दखल
उदय जगताप यांच्या कार्यावर आधारित ‘गोंडवनाचा सांगावा’ आणि ‘यारी भाईगिरी दुनियादारी’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत छत्तीसगड सरकारनेही त्यांना तेथे अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी निमंत्रित केले.
सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी आदर्श
एका सामान्य गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने समाजातील वंचित, उपेक्षित आणि हिंसेच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. शिक्षण, पुनर्वसन, विकास, शांतता आणि सामाजिक सलोखा या माध्यमातून उदय जगताप यांनी समाजपरिवर्तनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, मानवता आणि राष्ट्रसेवेचा प्रभावी संदेश आजच्या तरुण पिढीला मिळत आहे.
Comments
Post a Comment