अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वाखालील एनपीएस लढ्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने नगरपरिषद शिक्षक-कर्मचाऱ्यांना दिलासा, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा पाठपुरावा निर्णायक
कराड : विद्या मोरे ; राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करावी, या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सातत्याने लढा उभारण्यात आला होता. निवेदने, बैठका आणि शासनस्तरावरील पाठपुरावा यामुळे या मागणीला अखेर यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना एनपीएस लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली. त्यांच्या विशेष प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील हजारो नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, हा विजय संघटनेच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा, शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा आणि शासनाच्या सकारात्मक भूमिकेचा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली एनपीएसची मागणी पूर्ण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेला मोठा आधार मिळणार आहे. उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे साहेब यांनी यासाठी संघटनेस दोन वेळा बैठकी साठी निमंत्रित केले होते.कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उप मुख्यमंञी एकनाथ शिंदे, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले,कराड चे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment