विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ सुरू; मतदारांनी बीएलओंना सहकार्य करून नावाची खात्री करावी
कराड, ता. १० : विद्या मोरे; भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम सुरू करण्यात आली असून मतदारयादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या मोहिमेदरम्यान बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करतील. संबंधित मतदार घरी नसल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक आवश्यक माहिती देऊ शकतात तसेच विहित नमुन्यातील अर्जावर स्वाक्षरीही करू शकतात. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांनाही या प्रक्रियेत सहज सहभागी होता येणार आहे.
प्रशासनाने या मोहिमेत डिजिटल सुविधांनाही प्राधान्य दिले आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर, Voter Helpline किंवा ECINET मोबाईल ॲपद्वारे आपल्या नावाची पडताळणी करता येणार आहे. तसेच ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा वगळण्याबाबतचे दावे व हरकती ऑनलाइन दाखल करता येतील.
दरम्यान, मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांचे अधिकृत मतदान केंद्र प्रतिनिधी (BLA) देखील नागरिकांना आवश्यक सहकार्य करणार आहेत. त्यामुळे मतदारयादीतील त्रुटी कमी होऊन प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
पुनरीक्षण कार्यक्रम :
- ३० जून ते २९ जुलै : बीएलओंच्या घरोघरी भेटी व माहिती संकलन.
- ५ ऑगस्ट : प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध.
- ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर : दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी.
- ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर : दावे व हरकतींवर निर्णय.
- ७ ऑक्टोबर : अंतिम मतदारयादी प्रसिद्ध.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी नागरिकांना आपल्या घरी येणाऱ्या बीएलओंना आवश्यक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment