लायन्स क्लब मसूर , महावितरण आणि दादासाहेब चव्हाण विद्यासंकुलाच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षा जनजागृती कार्यशाळा राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना सुरक्षित वीज वापराचे धडे
● कराड, दि. ६ : विद्या मोरे ; राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त लायन्स क्लब मसूर , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) आणि दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्युत सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
● कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगली प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश वायदंडे यांनी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. घरगुती तसेच शैक्षणिक परिसरात विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर, उघड्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखणे, ट्रान्सफॉर्मर परिसरात घ्यावयाची खबरदारी आणि विद्युत अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
● आपत्कालीन परिस्थितीत विद्युत अपघात झाल्यास घ्यावयाची काळजी, प्रथमोपचाराचे महत्त्व आणि जखमी व्यक्तीला सुरक्षितरीत्या मदत करण्याच्या पद्धती याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिकांसह करण्यात आलेल्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक प्रभावीपणे समजला.
● प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. विद्युत सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
● कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप चव्हाण, विश्वस्त अरुणा चव्हाण, सचिव अमित चव्हाण आणि डॉ. वृषाली चव्हाण यांचे सहकार्य लाभले. विभागप्रमुख डॉ. अतुल गुरव, प्रतीक जाधव, अक्षय थोरात आणि स्वयंसेवकांनी नियोजनाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली.
● कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसूरचे सहाय्यक अभियंता अजित सूर्यवंशी यांनी केले, तर गिरीश मांडके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, महाराष्ट्र राज्य जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. रमेश लोखंडे, जितेंद्र निकम, डॉ. अशोक कांबळे, प्राचार्य डॉ. विक्रम शिंदे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
● समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याचा लायन्स क्लबचा उद्देश या कार्यशाळेतून यशस्वीपणे साध्य झाला. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे स्वागत करून भविष्यातही असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली
Comments
Post a Comment