कराड-मलकापूर फ्लायओव्हर खालील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा नागरिकांच्या गैरसोयीं बाबत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या स्पष्ट सूचना
कराड ता. ८ : विद्या मोरे ; कराड व मलकापूर शहरांना जोडणारा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरही त्याखालील मुख्य रस्ते, सेवा रस्ते व गटारांची कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर येथील प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून रखडलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
अपूर्ण कामांमुळे नागरिक त्रस्त
आमदार डॉ. भोसले यांनी पत्रात नमूद केले आहे की, फ्लायओव्हर सुरू झाल्यानंतरही दोन्ही बाजूंचे मुख्य रस्ते आणि सेवा रस्त्यांची कामे अपूर्ण असल्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण कामांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बेकायदेशीर पार्किंग व पाणी साचण्याची समस्या
फ्लायओव्हरखालील मोकळ्या जागांचा बेकायदेशीर पार्किंगसाठी वापर होत असून त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तसेच पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.
तुंबलेल्या गटारांमुळे आरोग्याचा प्रश्न
अनेक ठिकाणी गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. यामुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गटारे व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी अधोरेखित केले आहे.
युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याची मागणी
विशेषतः कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंतचा मुख्य रस्ता, सेवा रस्ते व गटारांची सर्व रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. ही कामे लवकर पूर्ण झाल्यास वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होईल आणि नागरिकांना दैनंदिन समस्यांपासून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment