सी.एम. श्री' योजनेत कराड तालुक्यातील शाळांना प्राधान्य; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याला यश राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची विधानसभेत ग्वाही; आधुनिक शिक्षण सुविधांचा लाभ मिळणार
कराड, ता. ९ : विद्या मोरे ; राज्यातील शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'सी.एम. श्री' योजनेत कराड तालुक्यातील शाळांचा प्राधान्याने समावेश करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत केली. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित करत कराड तालुक्याचा प्राधान्याने विचार करण्याची जोरदार मागणी केली होती.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची प्रभावी अंमलबजावणी :
केंद्र सरकारने देशभरात 'पी.एम. श्री' शाळा विकसित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 'सी.एम. श्री' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे शासकीय शाळांमध्ये आधुनिक सुविधा, डिजिटल वर्गखोल्या, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची ठाम मागणी :
विधानसभेत बोलताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड तालुक्यातील शाळांचा 'सी.एम. श्री' योजनेत प्राधान्याने समावेश करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील या योजनेचा लाभ कराडमधील विद्यार्थ्यांनाही मिळावा, अशी त्यांनी भूमिका मांडली.
राज्यमंत्र्यांची स्पष्ट ग्वाही :
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी उत्तर देताना राज्यातील सुमारे ४,८०० शासकीय शाळांची निवड करण्यात आली असून, प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. मंजुरी मिळताच राज्यभरात योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कराडसह सातारा जिल्ह्यालाही लाभ :
आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलेली मागणी सकारात्मक असल्याचे नमूद करत, कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शाळांचाही 'सी.एम. श्री' योजनेत समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली.
विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी :
या घोषणेमुळे कराड तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा, तंत्रज्ञानाधारित शिक्षण, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षण क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Comments
Post a Comment