चोर, गुंड, मवाल्यांचे नव्हे; गुणवंत विद्यार्थ्यांचे बॅनर झळकू द्या’ : सातारा पोलीस दलाचा प्रेरणादायी संदेश
कराड, दि. ६ : विद्या मोरे ; समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा उदोउदो करण्याऐवजी शिक्षणाच्या बळावर यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा, असा सकारात्मक आणि समाजप्रबोधनाचा संदेश सातारा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदनासाठी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत अभिनंदनपर फलक उभारण्यात आला असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणे हे केवळ विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे नव्हे, तर त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, पालकांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांचे फलित असते. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
अनेकदा समाजात चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तींचे वाढदिवस, स्वागत किंवा इतर कारणांसाठी मोठमोठे बॅनर झळकत असतात. अशा प्रवृत्तींना प्रसिद्धी देण्याऐवजी शिक्षण, संस्कार, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या बळावर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजासमोर आदर्श म्हणून उभे करण्याची गरज असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले आहे.
"चोर, गुंड, मवाल्यांचे बॅनर नकोत... हुशार विद्यार्थ्यांचे भविष्य बॅनरवर झळकू द्या!" हा संदेश देत सातारा पोलीस दलाने समाजाला विधायक विचारांची दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे शिक्षणाचा सन्मान असून, अशा उपक्रमांमुळे शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सातारा पोलीस दलाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक क्षेत्र तसेच जीवनातील प्रत्येक टप्प्यावर यश मिळवून कुटुंब, शाळा, कराड शहर आणि सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही पोलीस दलाने दिल्या.
या अभिनंदन उपक्रमामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून समाजात शिक्षण, गुणवत्ता आणि सकारात्मक कार्याला प्राधान्य देण्याची नवी प्रेरणा मिळेल, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment