जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील रविवारी कराड दौऱ्यावर खोडशी बंधारा, कृष्णा कालवा आणि टेंभू उपसा सिंचन योजनेची करणार प्रत्यक्ष पाहणी; प्रकल्पांच्या प्रगतीचा घेणार आढावा
कराड, ता. २५ : विद्या मोरे; महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील हे रविवार, दि. २६ जुलै रोजी कराड तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, तालुक्यातील महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून विकासकामांचा सविस्तर आढावा घेणार आहेत. या दौऱ्यामुळे कराडसह परिसरातील सिंचन व्यवस्थेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
खोडशी बंधाऱ्याची पाहणी :
रविवारी दुपारी ३.१५ वाजता डॉ. विखे-पाटील यांचे खोडशी (ता. कराड) येथे आगमन होणार आहे. येथे ते खोडशी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी साठवण क्षमता, बंधाऱ्याची सद्यस्थिती तसेच सिंचनासाठी होणाऱ्या पाणी वापराबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत.
कृष्णा कालव्याचा आढावा :
यानंतर मंत्री डॉ. विखे-पाटील कृष्णा कालव्याची पाहणी करणार असून, कालव्याच्या दुरुस्तीची कामे, पाणी वितरण व्यवस्था, कालव्याची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार आहेत.
टेंभू उपसा सिंचन योजनेला भेट :
यानंतर टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत टेंभू पंपगृह टप्पा १-अ, टेंभू बॅरेज आणि टेंभू पंपगृह टप्पा १-ब या महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात येणार आहे. कराड व सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला या योजनेचा लाभ होत असल्याने या पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक :
दौऱ्यादरम्यान जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते यांच्यासमवेत मंत्री डॉ. विखे-पाटील प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, निधी, भविष्यातील नियोजन तसेच प्रस्तावित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. प्रकल्पांची गुणवत्ता आणि कामांना गती देण्याबाबतही आवश्यक सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.
कृष्णा विश्व विद्यापीठाला भेट :
सिंचन प्रकल्पांच्या पाहणीनंतर मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील हे मलकापूर-कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाला भेट देऊन तेथील नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता ते मोटारीने साताऱ्याकडे प्रयाण करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या :
जलसंपदा मंत्र्यांच्या या दौऱ्याकडे कराड तालुक्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे. या पाहणीमुळे सिंचन प्रकल्पांच्या प्रलंबित कामांना गती मिळून पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment