समाज सेवेचा गौरव, महिला सक्षमीकरणाचा नवा संकल्प; इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा १३ वा पदग्रहण सोहळा उत्साहात :विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव • 'हॅपी स्कूल प्रोजेक्ट'ला बळ • २० नव्या सदस्यांचा प्रवेश

 कराड : विद्या मोरे 

भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा १३ वा पदग्रहण समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा वेणूताई चव्हाण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्राणा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा व समाजसेविका डॉ. प्राची पाटील उपस्थित होत्या. विठ्ठलाच्या नामगजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कांचन कालेकर ग्रुपने सादर केलेल्या वारीवरील नृत्याविष्काराने सभागृह भक्तिमय झाले, तर जया सचदेव यांनी मेडिटेशनद्वारे सकारात्मक वातावरण निर्माण केले.                                                     नवीन कार्यकारिणीकडे क्लबची धुरा

सन २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षा मनीषा पाटील, उपाध्यक्षा सुषमा तिवारी, सचिव हेमलता फुटाणे, सहसचिव छाया पवार, खजिनदार शिवांजली पाटील, आयएसओ रत्नमाला शिंदे, संपादक विजयश्री मोहिते, सी.सी. नंदा आवळकर तसेच आय.पी.पी. सारिका शहा यांनी पदभार स्वीकारला.
सहा मान्यवरांचा इनरव्हील पुरस्काराने गौरव

समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. विद्या मोरे (सामाजिक कार्य), डॉ. राहुल फासे (क्रीडा), दीपक बेलवलकर (माऊंट एव्हरेस्ट सर), देवदास मुळे (स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती), विकास पाटील-काळे (शैक्षणिक कार्य) आणि डॉ. सौ. अस्मिता फासे (चित्रकला) यांचा इनरव्हील पुरस्काराने गौरव करण्यात आला.
महिला सक्षमीकरणासह समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य

नूतन अध्यक्षा मनीषा पाटील यांनी महिला सक्षमीकरण, युवक विकास, ज्येष्ठ नागरिक सेवा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या क्षेत्रांत प्रभावी उपक्रम राबवून क्लबचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला.

नवीन सन्माननीय सदस्यांचा समावेश

यावेळी सौ. ऋग्वेदिका राजेंद्रसिंह यादव, सौ. संगीता आनंदा देसाई आणि अॅड. पद्मजा मिलिंद लाड यांचा सन्माननीय सदस्य म्हणून क्लबमध्ये समावेश करण्यात आला.
'तेजस्विनी' बुलेटिनचे प्रकाशन

चार्टर प्रेसिडेंट छाया पवार यांनी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. क्लबचे मुखपत्र 'तेजस्विनी' चे प्रकाशन करण्यात आले. तसेच सारिका शहा यांनी असिस्टंट झोनल को-ऑर्डिनेटर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हॅपी स्कूल प्रोजेक्टला सामाजिक हातभार

हॅपी स्कूल प्रोजेक्ट अंतर्गत कोपर्डे येथील जिल्हा परिषद शाळेला ५० लेझीम, स्पोर्ट्स किट तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. क्लबच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन २० नवीन सदस्यांनी क्लबमध्ये प्रवेश घेतला.
डॉ. प्राची पाटील यांचे सेवाभावी कार्याचे कौतुक

प्रमुख पाहुण्या डॉ. प्राची पाटील यांनी महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि सक्षमीकरणासाठी प्राणा फाउंडेशनचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली. इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमने समाजातील गरजू घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा घेतलेला वसा प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी क्लबच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले.

मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती

या कार्यक्रमास शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच क्लबच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली धर्मे यांनी केले, तर डॉ. शैलजा कुलकर्णी यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार