केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाला हिरवा कंदील :शासन व शिवाजी विद्यापीठाची मान्यता; शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू
उच्च शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती संधी लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार बहुविद्याशाखीय शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याच धोरणाच्या अनुषंगाने सुरू होणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धात्मक बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा अॅनालिटिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डिजिटल तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दर्जेदार, अद्ययावत आणि उद्योगाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण तसेच पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. विशेष म्हणजे प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य नसल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाची नवी संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, उद्योग क्षेत्राच्या गरजांशी सुसंगत आणि भविष्यातील रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त असा हा अभ्यासक्रम असल्याचे संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांनी सांगितले. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी संस्थेच्या प्रवेश कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
चौकट : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
- बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
- महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठाची मान्यता
- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश
- बारावी विज्ञान व पॉलिटेक्निक डिप्लोमा धारकांसाठी प्रवेश
- प्रथम वर्षासाठी सीईटी परीक्षा आवश्यक नाही
- AI, आयटी, सॉफ्टवेअर, डेटा सायन्स व सायबर सिक्युरिटी क्षेत्रात करिअरच्या संधी
- आधुनिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षणावर भर
Comments
Post a Comment