NEET पेपर घोटाळ्यावर कराड काँग्रेसचा संताप; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यसाठी भर पावसात रस्त्यावर उतरले कार्यकर्ते NEET पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ काँग्रेस रस्त्यावर; 'आमचे भविष्य सुरक्षित करा' या विद्यार्थिनीच्या फलकाने वेधले सर्वांचे लक्ष
कराड, दि.२२ ; विद्या मोरे देशभर चर्चेत असलेल्या कथित NEET पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कराड शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी दत्त चौक येथे भर पावसात तीव्र आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसाची पर्वा न करता काँग्रेस, युवक काँग्रेस आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आंदोलनादरम्यान काही काळ रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले, "देशातील विद्यार्थी आणि युवकांनी न्यायासाठी दिल्लीत आंदोलन केले असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनाही अटक करण्यात आली. ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब असून केंद्र सरकारची भूमिका विद्यार्थी आणि युवकांविरोधात असल्याचे दिसून येते. विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी काँग्रेसचा संघर्ष यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील."
जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पवार म्हणाले, "NEET प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील."
आंदोलनात मोठा सहभाग : सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवी बडेकर, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष बाबुराव पवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, प्रदेश प्रतिनिधी झाकीर पठाण, एससी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, प्रवीण वेताळ, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माने, चैतन्य पाटील, समीर इनामदार, वसीम इनामदार, दिग्विजय जमाले, महेश पवार, तुषार लोंढे, शानूर देसाई, अजित पवार, रविराज पाटील, संग्राम काळभोर, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, प्रतिक निकम, नितीन पाटील, मुबीन बागवान, उमर सय्यद, गणेश सूर्यवंशी, प्रदीप जाधव, सुरेश भोसले, युवराज कुंभार, अक्षय सुर्वे, अमोल जाधव, शाहरुख मुल्ला, सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस सेल आणि एससी काँग्रेस सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
🔷'आमचे भविष्य सुरक्षित करा' फलकाने वेधले लक्ष
आंदोलन सुरू असताना रस्त्याने जाणाऱ्या काही महिला आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी एका विद्यार्थिनीने हातात "आमचे भविष्य सुरक्षित करा" असा फलक घेतला होता. भर पावसात विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करणारा हा संदेश उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून गेला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतची चिंता आणि न्यायाची अपेक्षा या फलकातून प्रभावीपणे व्यक्त झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment