शेतकरी-कामगारांच्या हक्का साठीचा बुलंद आवाज; शेकापचा ७९ वा वर्धापन दिन कराडमध्ये उत्साहात
कराड ; विद्या मोरे
शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी गेली ७९ वर्षे संघर्ष करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा ७९ वा वर्धापन दिन कराड येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करत आगामी काळातील पक्षाची दिशा आणि युवकांच्या सहभागाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. भाई समीर देसाई म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाला ज्वलंत आणि क्रांतिकारी इतिहास लाभला आहे. शेतकरी, कष्टकरी, वंचित बहुजन, कामगार तसेच दिनदुबळ्या घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा बुलंद आवाज म्हणून पक्षाने गेली ७९ वर्षे आपली भूमिका कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या घामाचा, कष्टकऱ्यांच्या संघर्षाचा आणि लालबावट्याच्या निष्ठेचा वारसा पक्षाने जपला आहे.
स्वातंत्र्याची पहाट जवळ येत असताना शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र राजकीय विचारधारेची गरज असल्याची भावना निर्माण झाली. त्यातून २ व ३ ऑगस्ट १९४७ रोजी आळंदी येथे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली. देशाला मिळणारी सत्ता शेतकरी आणि कामगारांच्या श्रमावर जगणाऱ्या भांडवलशाहीच्या हातात जाऊ नये, तसेच बहुजन समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्यासाठी स्वतंत्र पक्षाची आवश्यकता आहे, या भूमिकेतून पक्षाची स्थापना करण्यात आली.
पक्षाच्या स्थापनेवेळी केशवराव जेधे, क्रांतिसिंह नाना पाटील, भाऊसाहेब राऊत आणि शंकरराव मोरे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ विचारवंत उपस्थित होते. शेतकरी आणि कामगारांशी समरस होऊन त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याबरोबरच विधायक कार्यक्रम हाती घेण्याचा निर्धार त्यावेळी करण्यात आला. हा पक्षाच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी इतिहासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे अॅड. देसाई यांनी सांगितले.
बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा विचार करून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाणार असल्याचेही अॅड. देसाई यांनी सांगितले. शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असलेल्या तरुणांनी पुढे येऊन शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेसोबत सक्रियपणे जोडले जावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास भाई एम. आर. जाधव, भाई दिनकरराव गुरव आणि कराड पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अॅड. हैबतराव पवार, अॅड. अमित लाड, भाई अरुण डुबल, विद्याधर गायकवाड, संभाजी जाधव, महेश जिरंगे, महेश जमाले, युवराज मस्के, संदीप तिकवडे, प्रल्हाद माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment