अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जनहिताय फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रम उत्साहात ; दत्तात्रय दराडे यांनी केले उपक्रमाचे कौतुक
कराड : विद्या मोरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त जनहिताय फाऊंडेशन, हजारमाची-कराड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. फाऊंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
हजारमाची येथील M.S.E.B. विरवडे रोड, मूकबधिर शाळेजवळ दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन, अंकलिपी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक, फळे आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले.
शिक्षण हीच प्रगतीची खरी वाट या भावनेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ओळख नव्या पिढीला करून देणे, या उद्देशाने जनहिताय फाऊंडेशनने हा उपक्रम राबविला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी व उपेक्षित समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावणारा उपक्रम राबवून फाऊंडेशनने अण्णाभाऊंच्या सामाजिक बांधिलकीला कृतीची जोड दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी जनहिताय फाऊंडेशनच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे ही समाजहिताची महत्त्वपूर्ण बाब असून, अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत होते, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व गरजू घटकांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या शिक्षणाला शक्य तेवढी मदत करण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक तथा वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, विरवडे सरपंच गोतपागर मॅडम, माजी पोलीस अधिकारी बोटालजी, ग्रामपंचायत हजारमाचीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाजीराव कमाने, राजेंद्र ताटे, राज चव्हाण, दीपाली सावंत, विशाल लांडगे, विजय लांडगे, अशोक पवार, प्रकाश पवार, कल्याण डुबल, काकासो रामूगडे, मधुकर गवळी, बापू कळंत्रे, राजेंद्र गवार, सुरेश पोळ, बरगडे सर, राहुल शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जनहिताय फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करून अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
Comments
Post a Comment