सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची बुधवारी १३ वी पुण्यतिथी
कराड, ता. ४ : विद्या मोरे ; कृष्णाकाठच्या सहकार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या विकासाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी १३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील स्व. आप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बुधवारी सकाळी ८.३० वाजता पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच कराडसह वाळवा तालुक्यात विविध ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले जाणार आहे.
स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य या तीन क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून कृष्णाकाठच्या विकासाला नवी दिशा दिली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावला. त्यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या कृष्णा परिवारातील विविध शैक्षणिक संस्थांमधून आज असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वी कारकीर्द घडवत आहेत.
आरोग्य क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कराडसह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहेत.
सहकार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात स्व. आप्पासाहेबांनी उभारलेले कार्य आजही विविध संस्थांच्या माध्यमातून पुढे सुरू आहे. त्यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी त्यांच्या कार्याला उजाळा देत विविध कार्यक्रमांतून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment