कराडमध्ये गुरुवारी भव्य तिरंगा रॅली ३२५ फुटी तिरंग्यासह १० हजार नागरिकांचा सहभाग; आमदार अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली देशभक्तीचा जागर
कराड, ता. ११ : विद्या मोरे ; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कराडमध्ये गुरुवारी (ता. १३) सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत तब्बल १० हजार नागरिक सहभागी होणार असून, ३२५ फूट लांब आणि १० फूट रुंद भव्य तिरंगा हे रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
रॅलीच्या नियोजनासाठी कराड येथील शासकीय विश्रामगृहात आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी रॅलीचा मार्ग, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच नागरिकांचा सहभाग याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आमदार डॉ. भोसले म्हणाले, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी पक्षीय विचार, जात-धर्म आणि सामाजिक भेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
रॅलीला गुरुवारी सकाळी ९ वाजता लाहोटी कन्याशाळेपासून सुरुवात होणार आहे. तेथून चावडी चौक, आझाद चौक मार्गे रॅली शिवतीर्थ दत्त चौक येथे पोहोचणार आहे. नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन या देशभक्तीपर उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, कराडचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
३२५ फुटी तिरंगा ठरणार आकर्षण
तिरंगा रॅलीसाठी विशेष ३२५ फूट लांब आणि १० फूट रुंद तिरंगा तयार करण्यात आला आहे. हजारो नागरिकांच्या सहभागासह हा भव्य तिरंगा कराडच्या रस्त्यांवरून नेण्यात येणार असून, रॅलीचे हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
Comments
Post a Comment