गावाच्या दारी प्रशासन; नागरिकांच्या कामांना मिळाला वेग महाराजस्व समाधान शिबिरातून १,६५० दाखल्यांचे वितरण; आ. अतुलबाबा भोसले यांचा लोकाभिमुख प्रशासनावर भर

 

कराड, ता. १२ : विद्या मोरे ; नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासनाने थेट गावपातळीवर पोहोचणे गरजेचे आहे. नागरिकांची कामे जलद आणि सुलभ पद्धतीने मार्गी लागावीत, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने विंग (ता. कराड) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आ. डॉ. भोसले बोलत होते.

आ. भोसले म्हणाले, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. नागरिकांना शासनाच्या सेवा आणि योजनांचा लाभ सहज मिळावा, यासाठी अशा शिबिरांची भूमिका महत्त्वाची आहे.

कराड तालुक्यातील विविध शासकीय विभाग चांगल्या पद्धतीने काम करीत असून, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. एस.आय.आर. मोहिमेतही प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे आ. भोसले यांनी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार म्हणाले, महाराजस्व समाधान अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे १० लाख नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. विविध विभागांमार्फत नागरिकांच्या कामांचा निपटारा करण्यात आला. तसेच लाभार्थ्यांना तब्बल १ हजार ६५० दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, उपनिबंधक अर्चना यादव, जिल्हा परिषद सदस्य शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, पंचायत समिती सदस्य अर्जुन कराळे, दादासाहेब मरगळे, वर्षा निकम, माधवी पाटसुपे, गोविंद गावडे, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदा खबाले, छबन कांबळे, प्रमोद पाटील, कराडचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, सरपंच दिपाली पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार