कराडच्या प्रलंबित प्रश्नांवर झाकीर पठाण आक्रमक!फ्लेक्स, कचरा डेपो आणि प्रकाश नगरातील कामांवरून प्रशासनाला घेरणार; १२ ऑगस्टपासून तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आला
कराड, ता. १३ : विद्या मोरे ; कराड शहरातील विविध प्रलंबित नागरी प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिल्यास १२ ऑगस्ट २०२६ पासून कराड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
बेकायदेशीर फ्लेक्सवर कारवाईची मागणी
कराड शहरातील निवडणुकीनंतर लावण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर फ्लेक्स बोर्डांवर तातडीने कारवाई करावी. संबंधित नगरसेवकांची भूमिका तपासून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पठाण यांनी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने जाहिराती व फ्लेक्स लावूनही संबंधितांवर कारवाई होत नसेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे त्यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.
कचरा डेपो प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा
कराड येथील कचरा डेपोमध्ये लाल माती टाकणे तसेच सुशोभीकरणाच्या कामांबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कामाची वस्तुस्थिती, परवानग्या आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रकाशनगरमधील कामांवरूनही नगरपरिषदेला सवाल
प्रकाशनगर येथे सोसायटीच्या स्वमालकीच्या जागेत सोसायटीची परवानगी न घेता नगरपरिषदेकडून ब्लॉक बसविणे, गटार बांधणे आणि उद्यान विकसित करण्याची कामे केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित जागेची मालकी व परवानगी यांची पडताळणी करून नियमबाह्य कामे तातडीने थांबवावीत. तसेच संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.
‘निवेदने देऊनही कार्यवाही नाही’
या सर्व प्रश्नांबाबत यापूर्वी कराड नगरपरिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी व निवेदने देण्यात आली. मात्र अद्याप अपेक्षित स्वरूपाची ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. त्यामुळे आता केवळ निवेदन देऊन थांबणार नसून नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लेखी कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
वरील सर्व प्रश्न सार्वजनिक हिताशी संबंधित असल्याने प्रशासनाने त्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी व कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्यास १२ ऑगस्टपासून कराड तहसीलदार कार्यालयासमोर शांततामय व लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही झाकीर पठाण यांनी दिला आहे.
निवेदनाच्या प्रती कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कराड तहसीलदार, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment