प्रशासनाच्या दारात ४७ दिवसांच्या आंदोलन कर्त्याची अनोखी पंगत; स्वातंत्र्यदिनाला नागरिकांना जेवण
कराड : विद्या मोरे
कराड तहसील कार्यालयासमोर कापील येथील गणेश पवार यांचे विविध मागण्यांसाठी गेल्या ४७ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ पवार यांनी आंदोलनस्थळीच नागरिकांना जेवण देत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला.
आंदोलन म्हटले की धरणे, उपोषण, मोर्चे, निदर्शने आणि घोषणांचा आवाज असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, कराड तहसील कार्यालयासमोरील आंदोलनाने या पारंपरिक पद्धतीला वेगळे वळण दिले. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रशासनाच्या दारातच अन्न शिजवून नागरिकांना सामूहिक जेवण देण्यात आले.
गेल्या ४७ दिवसांपासून ज्या प्रशासनाच्या दारात न्यायाची मागणी केली जात आहे, त्याच ठिकाणी नागरिकांच्या ताटात अन्न वाढण्यात आले. प्रशासनाने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे आणि आंदोलनाची दखल घ्यावी, हा या उपक्रमामागील संदेश असल्याचे गणेश पवार यांनी सांगितले.
“ही केवळ जेवणाची पंगत नव्हती, तर प्रशासनाला जागे करण्यासाठी जनतेसमोर मांडलेला निषेधाचा अनोखा मार्ग होता,” असे पवार यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment