“३५ हजार कोटी कुठे खर्च करणार?”; कुंभमेळ्याच्या निधीवर पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला थेट सवाल“ आधी सविस्तर डीपीआर जनतेसमोर आणा, मगच निधी खर्च करा”; कंत्राटे, कामे आणि खर्चाचा हिशेब जाहीर करण्याची मागणी
कराड; विद्या मोरे
नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या तब्बल ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला थेट सवाल केला आहे. एवढ्या मोठ्या निधीतून नेमकी कोणती कामे केली जाणार, त्यासाठी किती खर्च होणार, कामे कोणाला देण्यात आली आहेत आणि कंत्राटदारांची निवड कशी झाली, याचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) प्रथम जनतेसमोर जाहीर करा. डीपीआर सार्वजनिक झाल्याशिवाय एकही रुपया खर्च करू नये, अशी ठाम भूमिका चव्हाण यांनी मांडली.
नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू खैरे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ. दिनेश बच्छाव, सागर वाहूळ, स्वप्नील पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कुंभमेळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी निधी देण्यास काँग्रेसचा विरोध नाही. काँग्रेस सरकारच्या काळातही कुंभमेळ्यासाठी निधी देऊन नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी विविध विकासकामे करण्यात आली होती. मात्र, यावेळी सांगितला जाणारा ३५ हजार कोटी रुपयांचा निधी हा मागील कुंभमेळ्यांच्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. त्यामुळे या निधीच्या नियोजनाची आणि खर्चाची संपूर्ण माहिती जनतेला मिळाली पाहिजे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
“कामे कोणती आणि कंत्राटदार कोण?”
कुंभमेळा निधीतून कोणती कामे केली जाणार आहेत, त्यांची अंदाजित किंमत किती आहे, कामे कोणत्या संस्था अथवा कंत्राटदारांना देण्यात आली आहेत, निवड प्रक्रिया काय होती आणि निधीचा विभागनिहाय विनियोग कसा होणार आहे, याची संपूर्ण माहिती सरकारने सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र ‘कुंभमेळा मंत्री’ नियुक्त करण्यात आला आहे. ही नियुक्ती कोणत्या मंत्रालयाच्या अधिकारात झाली, त्यासाठी कोणती प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात आली, याचाही सरकारने खुलासा करावा, असे ते म्हणाले.
“जनतेच्या पैशाचा हिशेब जनतेलाच द्यावा”
“जनतेच्या पैशाचा प्रत्येक रुपया कुठे आणि कसा खर्च होणार, हे जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. त्यामुळे ३५ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट प्रसिद्ध केल्याशिवाय या निधीचा खर्च करू नये,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्याशी संबंधित विकासकामांचा पर्यावरणावर आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम लक्षात घेता Environmental & Social Impact Assessment अहवाल तयार करून तोही आधी जनतेसमोर प्रसिद्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली.
स्मार्ट सिटीच्या कामांवरही निशाणा
स्मार्ट सिटी प्रकल्पावर टीका करताना चव्हाण म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात ‘जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूअल मिशन’ (JNNURM) हा प्रभावी शहरी विकास कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर मोदी सरकारने त्याचे नाव बदलून स्मार्ट सिटी केले; मात्र अपेक्षित परिणाम साधण्यात सरकारला यश आले नाही.
खड्ड्यांमुळे मृत्यू; एसआयटी चौकशी करा
नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे नागरिकांचे मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित करत चव्हाण यांनी सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला. या घटनांची स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
रिंगरोडचा आराखडा जनतेसमोर आणण्याची मागणी
नाशिक शहरासाठी रिंगरोड आवश्यक असल्याचे सांगताना कोणताही आराखडा अंतिम करण्यापूर्वी तो जनतेसमोर प्रसिद्ध करावा. नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून त्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, असेही चव्हाण यांनी सांगितले.
“कुंभमेळ्याला विरोध नाही; पारदर्शकतेला मात्र पर्याय नाही”
कुंभमेळा निधीच्या राजकारणावरही चव्हाण यांनी सरकारवर आरोप केले. मात्र, कुंभमेळ्यासाठी निधी देण्यास काँग्रेसचा कोणताही विरोध नसून जनतेच्या पैशाचा पारदर्शक पद्धतीने आणि योग्य कारणांसाठी वापर होणे हीच आमची मागणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
डीपीआर, पर्यावरणीय अहवाल, कामांची यादी, कंत्राटदारांची माहिती आणि खर्चाचा संपूर्ण तपशील जनतेसमोर आणल्यानंतरच कुंभमेळा निधी खर्च करावा, अशी ठाम मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
Comments
Post a Comment