बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स पदवी धारकांना एम.ई., एम.टेक साठी थेट प्रवेश एआयसीटीईचा मोठा निर्णय; संगणक शास्त्रातील उच्च शिक्षणाचा मार्ग झाला सुकर



कराड : विद्या मोरे

बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. चार वर्षांचा बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स ऑनर्स किंवा रिसर्च अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता एम.ई. आणि एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना थेट प्रवेश घेता येणार आहे.

एआयसीटीई, नवी दिल्लीच्या अधिनस्त तंत्रशिक्षण नियंत्रण करणाऱ्या कौन्सिलने १४ ऑगस्ट रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सनंतर एम.ई. अथवा एम.टेक. करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २६ मार्च २०२५ रोजीच्या परिनियमांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन देणे, तसेच विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या निर्णयाचा प्रमुख उद्देश आहे.

एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून चार वर्षांचा बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स ऑनर्स किंवा रिसर्च अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स विषयातील एम.ई. किंवा एम.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.

बारावीनंतर उच्च शिक्षणाची नवी दिशा 
बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेऊ शकतात. त्यानंतर एम.ई. किंवा एम.टेक. करून संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाची वाटचाल करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने अधिक व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत.

केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये एम.ई. व एम.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स पदवीधारक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांनी केले आहे.

एआयसीटीईच्या या निर्णयामुळे बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी असलेली काही बंधने कमी होऊन संगणकशास्त्रातील उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरसाठी अधिक व्यापक मार्ग उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार