माहेरच्या मातीने केला कर्तृत्ववान लेकींचा सन्मान! माजी खासदार वंदनाताई चव्हाण, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि विनिता कामटे यांचा भव्य नागरी सत्कार

 
कराड:  विद्या मोरे

राजकारण, न्यायव्यवस्था आणि साहित्य क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनींचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे आणि सुप्रसिद्ध लेखिका व वीरपत्नी विनिता अशोक कामटे यांचा गौरव करण्यात आला. माहेरच्या मातीने केलेल्या या प्रेमळ सत्काराने तिन्ही भगिनी भावूक झाल्या.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते हा सत्कार झाला. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. फेटा, शाल, श्रीफळ, मानपत्र, रेठरे बासमती तांदूळ, रेठरा पेढा आणि रेठरा तूप देऊन तिन्ही भगिनींचा सन्मान करण्यात आला.

माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या निधीतून साकारलेल्या कृष्णाघाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त तसेच कृष्णा विश्व विद्यापीठातील कार्यक्रमासाठी तिन्ही भगिनी कराड येथे आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर रेठरे बुद्रुक ग्रामस्थांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला.

सत्काराला उत्तर देताना ॲड. वंदनाताई चव्हाण यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. “आम्ही पुण्यात वाढलो असलो तरी आम्ही रेठरे बुद्रुकच्या आहोत, हे अभिमानाने सांगतो. गावकऱ्यांनी दिलेला प्रेमाचा ओलावा मनाला भावला,” असे त्यांनी सांगितले.

गावाने दिलेला सन्मान ही केवळ तिघी बहिणींची कौतुकाची थाप नसून, मुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वप्ने पाहण्याचे बळ देणाऱ्या पालकांचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलींना आणि महिलांना पुढे जाण्यासाठी कुटुंबीयांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. सुरेश भोसले यांनी तिन्ही भगिनींच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्या रेठरे बुद्रुकच्या आहेत, ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा सत्कार आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, रेठरे बुद्रुकला प्रगत गाव बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, गावाचा आणि मतदारसंघाचा देशात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प आहे.

डॉ. इंद्रजित मोहिते यांनी तिन्ही भगिनींनी राजकारण, न्यायव्यवस्था आणि लेखन क्षेत्रात मिळविलेले यश हे चांगले संस्कार व उत्तम शिक्षणाचे फलित असल्याचे सांगितले.

सरपंच हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी मानपत्राचे वाचन केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. जि. प. सदस्य सौ. प्रियांका साळुंखे यांनी आभार मानले.

यावेळी ॲड. हेमंत चव्हाण, राहुल कामटे, जि. प. सदस्य शैलजा शिंदे, पं. स. सभापती नंदाताई यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सांगली महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुश्मिता जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृष्णाघाटाशी जोडलेल्या बालपणीच्या आठवणी

लहानपणी चुलत भावंडांसोबत शेतात जाणे, शेजाऱ्यांकडे पोहे खाणे आणि वडिलांसोबत मंदिर व नदीकाठी जाण्याच्या आठवणी ॲड. वंदनाताई चव्हाण यांनी सांगितल्या. “ज्या कृष्णा नदीचा लहानपणी आनंद घेतला, त्याच नदीवर घाट बांधण्याचे भाग्य मला लाभले, याचा विशेष अभिमान आहे,” असे त्या म्हणाल्या.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार