बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स पदवीधारकांना एम.ई., एम.टेक.साठी थेट प्रवेश एआयसीटीईचा मोठा निर्णय; संगणक शास्त्रातील उच्च शिक्षणाचा मार्ग झाला सुकर
कराड : विद्या मोरे
बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. चार वर्षांचा बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स ऑनर्स किंवा रिसर्च अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता कॉम्प्युटर सायन्स विषयातील एम.ई. आणि एम.टेक. अभ्यासक्रमांना थेट प्रवेश घेता येणार आहे.
एआयसीटीई, नवी दिल्लीच्या अधिनस्त तंत्रशिक्षण नियंत्रण करणाऱ्या कौन्सिलने २१ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सनंतर एम.ई. किंवा एम.टेक. करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २६ मार्च २०२५ रोजीच्या परिनियमांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून चार वर्षांचा बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स ऑनर्स किंवा रिसर्च अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्समधील एम.ई. किंवा एम.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.
बारावीनंतर उच्च शिक्षणाची नवी दिशा
बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेऊ शकतात. त्यानंतर एम.ई. किंवा एम.टेक. करून संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधन, तंत्रज्ञान आणि विविध कॉम्प्युटर क्षेत्रांमध्ये करिअरच्या अधिक व्यापक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांनी केले आहे.
एआयसीटीईच्या या निर्णयामुळे बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सनंतर विद्यार्थ्यांसमोरील पुढील शिक्षणाच्या काही मर्यादा कमी होऊन संगणकशास्त्रातील उच्च शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरसाठी अधिक व्यापक मार्ग उपलब्ध होणार आहेत.
Comments
Post a Comment