एआय युजर’कडून ‘एआय क्रिएटर’ बनण्याचा प्रवास; कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा उत्साहात समारोप विद्यार्थ्यांनी विकसित केले विविध एआय प्रकल्प; मान्यवरांच्या हस्ते प्रमाण पत्रांचे वितरण
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ एआयचा वापर न करता त्यातून नवनिर्मिती करावी, या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (KBPIMSR), सातारा येथे आयोजित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटेलिजेंट ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट’ या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला.
‘एआय युजर’पासून ‘एआय क्रिएटर’पर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवास घडविणे, हा या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू होता. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत माहिती, त्याचा व्यावहारिक वापर तसेच एआय आधारित ॲप्लिकेशन विकसित करण्याचे कौशल्य देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणातून प्रेरणा घेत विविध एआय प्रकल्प यशस्वीरीत्या विकसित केले.
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे यांनी यशासाठी मेहनत आणि सातत्य आवश्यक असल्याचे सांगितले. “कोणतीही नवीन गोष्ट निर्माण करण्यासाठी अथवा यश मिळवण्यासाठी कष्टाची नितांत गरज असते. कष्टाला पर्याय नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांतून स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार बनावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. बी. एस. सावंत यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात सतत शिकत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “नवनवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करा. मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या विकासासाठी करा,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे यशस्वी समन्वयन सौ. पी. ए. लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. प्रीती श्री यांनी केले, तर सौ. टी. एन. शेवते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारा आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला चालना देणारा हा उपक्रम भविष्यातील ‘एआय क्रिएटर्स’ घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
Comments
Post a Comment