अध्यक्ष अश्विनी वेताळ यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या प्रलंबित प्रश्नांवर आदिशक्ती महासंघ आक्रमकभटक्या कुत्र्यांपासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत विविध मागण्या; तहसील कार्यालया समोरील उपोषणाचा दुसरा दिवस

 

कराड, दि. १३ :  विद्या मोरे ; कराड शहर व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिशक्ती महासंघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शांततामय उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कराड शहर व तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील मनुष्यबळाची कमतरता, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था, कोल्हापूर नाका येथे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच प्रीतिसंगम घाटावरील हिरकणी कक्ष व स्वच्छतागृहांची स्वच्छता व देखभाल या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रश्नांबाबत प्रशासनाकडे यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. प्रत्यक्ष पाठपुरावा करण्याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व व्हिडिओद्वारेही संबंधित समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. मात्र, अद्याप अपेक्षित ठोस कार्यवाही झालेली नसल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, श्वान नियंत्रण, निर्बीजीकरण व लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान, शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता, पाणी व नियमित देखभालीचा अभाव असल्याने नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. कोल्हापूर नाका येथे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.

“आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कार्यवाही आणि निश्चित कालमर्यादा हवी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. संबंधित मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन त्याची लेखी माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार