वास्तुकला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव‘हिरोजी इंदुलकर पुरस्कार २०२६’साठी श्री. श्रीधर कंग्राळकर यांची निवड
कराड, दि. ७ : विद्या मोरे ; वास्तुकला, नगररचना आणि बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण योगदान देणारे कंग्राळकर असोसिएट्स, सातारा येथील संचालक श्री. श्रीधर कंग्राळकर यांची नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) कराड यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘हिरोजी इंदुलकर पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे.
श्री. श्रीधर कंग्राळकर यांनी गेल्या अनेक दशकांपासून वास्तुकला व बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. आधुनिक वास्तुरचना, दर्जेदार बांधकाम आणि नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य देत त्यांनी या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
व्यावसायिक कार्यासोबतच गुणवत्तापूर्ण आणि समाजाभिमुख विकासाची बांधिलकी जपत त्यांनी वास्तुकला क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या दीर्घकालीन कार्याची दखल घेत नरेडको कराडने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
‘हिरोजी इंदुलकर पुरस्कार’ हा वास्तुकला आणि बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करणारा नरेडको कराडचा मानाचा सन्मान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांच्या अद्वितीय वास्तुकला कौशल्याला अभिवादन म्हणून या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे.
सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ‘बिल्डर्स डे २०२६’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. श्री. मकरंद पाटील यांच्या हस्ते श्री. श्रीधर कंग्राळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
वास्तुकला आणि बांधकाम क्षेत्रात सातत्याने गुणवत्तेचा ध्यास घेत केलेल्या कार्याचा हा सन्मान असून, त्यांच्या या निवडीबद्दल बांधकाम व वास्तुकला क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment