सोमवार पेठेत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी १० ते १२ नागरिकांना चावा
कराड ; विद्या मोरे
सोमवार पेठ परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून, आज एकाच दिवशी तब्बल १० ते १२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची गंभीर घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवार पेठेतील गणपती मंदिर गवळवेस, मयूर गणेश मंडळ परिसर, भैरोबा गल्ली, दत्त मंदिर गल्ली, काळा मारुती मंदिर गल्ली, अंबाबाई मंदिर परिसर ते पाण्याची टाकी तसेच परिसरातील इतर भागांत भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणेही धोकादायक ठरत आहे.
दुचाकीस्वारांच्या मागे कुत्री धावत असून, पादचाऱ्यांच्या अंगावरही ती धावून जात आहेत. शाळकरी मुले आणि क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष भीतीचे वातावरण आहे. आज अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने हा प्रश्न केवळ त्रासापुरता मर्यादित राहिला नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला आहे.
याशिवाय काही अपार्टमेंट परिसरात भटक्या कुत्र्यांकडून घाण केली जात असल्याने अस्वच्छतेची समस्याही निर्माण झाली आहे.
एकाच दिवशी १० ते १२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतरही नगरपालिका प्रशासन आणखी किती घटना घडण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपालिका प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी सोमवार पेठेतील नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment