रात्री पुलाखाली एकटी अन् गोंधळलेली; नावाचा एकच धागा, पोलिसांनी शोधले कुटुंब! २९ वर्षीय तरुणी सुखरूप घरी
कराड : विद्या मोरे रात्रीच्या वेळी कोल्हापूर नाका परिसरातील पुलाखाली एक २९ वर्षीय तरुणी गोंधळलेल्या आणि असहाय्य अवस्थेत एकटीच बसलेली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर नेमके कुठे जायचे, कोणाला संपर्क करायचा, हेही तिला सांगता येत नव्हते. अशा परिस्थितीत कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई आशिष पाटील आणि नवनाथ पाटील यांच्या नजरेस ती पडली. पोलिसांनी तत्काळ तिच्याशी आपुलकीने संवाद साधत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पाटण तालुक्यातील बहुले येथील ही २९ वर्षीय तरुणी नातेवाईकांकडे जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास ती कराड येथील कोल्हापूर नाका परिसरातील पुलाखाली एकटीच बसलेली आढळून आली.
पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिला सुरुवातीला केवळ स्वतःचे नावच सांगता येत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आशिष पाटील आणि नवनाथ पाटील यांनी कोणताही दबाव न आणता संयमाने तिच्याशी संवाद साधला. मिळालेल्या तुटक माहितीच्या आधारे तिच्या राहत्या गावाचा शोध घेण्यात आला.
नावाचा एकच धागा पकडून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. अखेर तिच्या भावाचा मोबाईल क्रमांक मिळवण्यात यश आले आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहोचली.
नातेवाईक येईपर्यंत पोलिसांनी तरुणीला एकटे सोडले नाही. तिची काळजी घेत तिला खाण्यासाठी नाष्टाही देण्यात आला. काही वेळाने तिचा भाऊ मोटारसायकलवरून कोल्हापूर नाका येथे पोहोचला.
आवश्यक खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तरुणीला सुखरूपपणे तिच्या भावाच्या ताब्यात दिले. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
या संपूर्ण प्रसंगात पोलीस शिपाई आशिष पाटील आणि नवनाथ पाटील यांनी दाखवलेली सतर्कता, तत्परता, संयम आणि माणुसकी कौतुकास्पद ठरली. त्यांच्या या कार्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी कौतुक केले.
अडचणीत सापडलेल्या नागरिकाला केवळ कर्तव्याच्या चौकटीत न पाहता माणुसकीच्या भावनेतून आधार देत सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचे काम या पोलिसांनी केले. त्यांच्या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment