मराठी साहित्याचा संवेदनशील आणि अभ्यासू आवाज हरपला; श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी – पृथ्वीराज चव्हाण
कराड : विद्या मोरे ; कराडचे ज्येष्ठ साहित्यिक, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
प्रसिद्धीस दिलेल्या शोकसंदेशात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि मूल्यनिष्ठ साहित्यिक हरपला आहे. ‘पाण्याचे पंख’, ‘कोरडी भिक्षा’, ‘डोह’ आणि ‘सोन्याचा पिंपळ’ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी आपल्या वेगळ्या अनुभवविश्वाचा अत्यंत प्रभावी आविष्कार वाचकांसमोर मांडला.”
कुलकर्णी यांच्या लेखनाला चित्रदर्शी शब्दकलेची लाभलेली जोड, चित्रकलेतील संस्कारातून आलेली दृष्यमयता, निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणातून वर्णनात उतरलेला बारकावा आणि अनुभवाच्या तळाशी पोहोचणारी पारदर्शक लेखनशैली यामुळे त्यांच्या साहित्याला स्वतंत्र उंची प्राप्त झाली. ललित लेखनाला नवे परिमाण देणारे लेखक म्हणून श्रीनिवास कुलकर्णी यांचे नाव साहित्य क्षेत्रात आदराने घेतले जाते, असे चव्हाण यांनी नमूद केले.
श्रीनिवास कुलकर्णी यांचे साहित्य केवळ मराठीपुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्या साहित्याचा कानडी, बंगाली तसेच इंग्रजी भाषेतही प्रसार झाला. महाराष्ट्र फाउंडेशनच्या ‘साहित्यरत्न पुरस्कारासह’ महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला. अर्धशतकाहून अधिक काळाच्या साहित्यसेवेची ही यथोचित पावती होती. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा कराडकरांना सदैव सार्थ अभिमान राहील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रदीर्घ साहित्यिक वाटचालीत ललित लेखनाला वेगळी दिशा देत मराठी साहित्याच्या समृद्धीत मोलाची भर घातली. त्यांच्या साहित्यकृतींमधून मानवी जीवन, निसर्ग आणि अनुभवविश्वाचे संवेदनशील दर्शन घडले. त्यांच्या लेखनाने अनेक पिढ्यांतील वाचकांवर आपला ठसा उमटवला.
“श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करतो. कुलकर्णी कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना,” अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Comments
Post a Comment